खोपोली : कराड येथून मुंबईला प्रवासी घेवून जाणाऱ्या खाजगी बसने भरधाव वेगात कंटेनरला धडक दिली. त्यात बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर प्रवाशांनी बस चालकाला शिवीगाळ करत मारहाण केल्यामुळे घाबरलेल्या चालकाने अंधारात मार वाचविण्यासाठी दोन्ही रस्त्याच्यामध्ये असलेल्या मोकळ्या जागेत उडी मारली. अंधारात जागेचा अंदाज न आल्याने चालक पुलावरून खाली कोसळून ठार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे घडली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भरधाव वेगात असताना बसचा चालक मंगेश पालकरचे (४५, रा. डोंबिवली) बसवरील नियंत्रण सुटल्याने पहाटेच्या सुमारास आडोशी गावाजवळ बसने पुढे जात असलेल्या कंटेनरला धडक दिली. झोपेत असलेल्या प्रवाशांना किरकोळ मार लागला. चालकामुळे अपघात झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरलेल्या चालकाने पळ काढला. अंधारात मोकळ्या जागेचा अंदाज न आल्याने दोन पुलांच्यामध्ये असलेल्या जागेतून १०० फूट खोल दरीत पडल्याने चालक मंगेश ठार झाला. घटनेनंतर बसचालकाचा शोध घेतला मात्र तो सापडत नसल्याने पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनीही शोध मोहीम सुरू केली आणि सकाळी खोल दरीत त्याचा मृतदेह आढळून आला. अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मृतदेह खोल दरीत असल्याने महामार्ग पोलीस, उपनिरीक्षक जोशी, आयआरबीचे विजय भोसले, गुरुनाथ साठेलकर व देवदूतच्या पथकाने दरीत उतरून अथक प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढला.
मार वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा मृत्यू
By admin | Published: March 29, 2016 1:55 AM