आगीत वृद्धेचा मृत्यू; दोघे गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 06:18 AM2018-12-03T06:18:37+5:302018-12-03T06:18:44+5:30
महालक्ष्मी येथील केशवराव खाडे मार्गावरील अठरा मजली इमारतीला रविवारी पहाटे लागलेल्या आगीत ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
मुंबई : महालक्ष्मी येथील केशवराव खाडे मार्गावरील अठरा मजली इमारतीला रविवारी पहाटे लागलेल्या आगीत ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. स्थानिकांसह अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून वाचविले ९७ रहिवाशांचे प्राण वाचविले आहेत. येथील सम्राट अशोक इमारतीच्या (ए -१) तिसऱ्या मजल्याला ही आग लागली. यात लक्ष्मीबाई कोळी (७०) यांचा मृत्यू झाला, तर राघव बारीया आणि वेलीबेन बारिया हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर भाटिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तसेच आगीची झळ बसलेल्या ९७ जणांवर नायर रुग्णालयात उपचार करून, त्यांना सोडून देण्यात आले आहे.
मुंबई अग्निशमन दल आणि मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास महालक्ष्मी येथील केशवराव खाडे मार्गावरील अठरा मजली इमारतीच्या तिसºया माळ्यावर आग लागली. आगीची माहिती प्राप्त होताच अग्निशमन दलाचे जवान रात्री ३च्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी चार फायर इंजिन, तीन जेट्टींसह उर्वरित साधनांचा वापर करण्यात आला. ऐन पहाटेच्या साखर झोपेत असताना ही घटना घडल्याने इमारतीमधील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढणे, हे अग्निशमन दलासमोरील आव्हान होते.
घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल होण्यापूर्वी लगतच्या स्थानिकांनी इमारतीमधील २० रहिवाशांना सुखरूप बाहेर काढत नायर रुग्णालयात दाखल केले होते. तर आग शमविण्याचे काम सुरू असतानाच अग्निशमन दलानेही इमारतीच्या जिन्याच्या मदतीसह उर्वरित मार्गाने आगीत अडकलेल्या रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. पहाटे ५च्या सुमारास आग आटोक्यात आली.
दरम्यान, या आगीत इलेक्ट्रिक डक्ट, केबल्ससह उर्वरित साहित्य जळून खाक झाले असून, आगीमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.