अग्निशमन केंद्र अधिकाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:07 AM2021-09-18T04:07:30+5:302021-09-18T04:07:30+5:30
मुंबई - अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी उत्कर्ष बोबडे यांचे नुकतेच निधन झाले. अग्निशमन दलातील प्रशिक्षणात भाग घेऊन कठोर परिश्रम ...
मुंबई - अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी उत्कर्ष बोबडे यांचे नुकतेच निधन झाले. अग्निशमन दलातील प्रशिक्षणात भाग घेऊन कठोर परिश्रम करून ते घरी परतले होते. त्यानंतर झोपेतच त्यांचा मृत्यू झाला, असा दावा करत ते कर्तव्यावर असल्याचे गृहीत धरून त्यांच्या कुटुंबीयांना मदत द्यावी, अशी मागणी फायर ब्रिगेड ऑफिसर्स असोसिएशनने पालिका प्रशासनाकडे केली आहे.
अग्निशमन दलात सन २००६ मध्ये भरती झालेले उत्कर्ष बोबडे हे सध्या केंद्र अधिकारी या पदावर कार्यरत होते. मागील काही दिवस अग्निशमन दलाच्या जवानांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामध्ये हे सहभागी झाले होते. ब्रिथिंग ॲपरेटस गॅलरी या ठिकाणी २० किलो वजन पाठीवर घेऊन अनेक अडथळे जसे शिडी चढणे, ट्रेड मिल्ल, सायकल चालवणे, छोट्या पाईपमधून २० किलो वजन घेऊन वाकड्या तिकड्या पाईपमधून दुसऱ्या बाजूला जाणे असे जोखमीचे प्रशिक्षण करून ते घरी परतल्यानंतर झोपेतच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश देवदास यांनी दिली. मृत्यूसमयी ते कामावर होते, असे मानण्यात यावे, अशी मागणी त्यांनी अग्निशमन दलाचे प्रमुख एच. परब यांच्याकडे केली आहे.