मुंबई : दर पावसाळ्यात अनेक भागांत दरड कोसळून दुर्घटना घडतात. तरीदेखील दरडींच्या ठिकाणी असलेल्या झोपड्या रिकामी करण्यात येत नाहीत. जीव मुठीत धरून मोठ्या संख्येने कुटुंबे या दरडींखालीच राहतात. या पार्श्वभूमीवर पावसाळा तोंडावर आला असतानाच मुंबई महापालिकेने वॉर्ड स्तरावर दरड कोसळणारे स्पॉट शोधले असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी पालिकेकडून आवश्यक ती कार्यवाही केली जाणार आहे.मुंबईत ७० हून अधिक ठिकाणी पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका असून, सर्वात जास्त धोकादायक ठिकाणे ही भांडुप, विक्रोळी, कुर्ला, घाटकोपर अशा पूर्व उपनगरात आहेत. या ठिकाणी पालिका, म्हाडा व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संरक्षक भिंत बांधणार आहे.मुंबईतील अनेक भागांत डोंगर, टेकड्या असून, या डोंगरांवर वस्त्या उभारण्यात आल्या आहेत. या झोपड्यांमध्ये लाखो नागरिक वर्षानुवर्षे जीव मुठीत घेऊन राहत आहेत. पावसाळ्यात अनेकदा या भागात दरड कोसळून नागरिकांचा बळी जातो. बऱ्याच झोपड्या या म्हाडाच्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जमिनीवर आहेत. त्यापैकी डोंगर उतारांवरील सर्वाधिक वसाहती या भांडुप, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, विद्याविहार या भागात आहेत.
दरडी कोसळण्याच्या ठिकाणी उपाय करा पूर्व उपनगरांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका अधिक आहे. या ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याचे काम विविध यंत्रणांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी पातळीवर योग्य समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना करा. - डॉ. इक्बाल सिंह चहल, आयुक्त, महानगरपालिका
भिंती बांधणार, चर बुजवणार- दरड कोसळणाऱ्या धोकादायक ठिकाणी पालिका प्रशासन म्हाडा व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संरक्षक भिंत बांधणार आहे.- धोकादायक दगडी हटवणे, पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था करणे, भिंतींचे चर बुजविणे आदी कामे केली जाणार आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजन विभागामार्फत खर्च केला जाणार आहे.
एनडीआरएफ, नौदल, अग्निशमन दलाला सज्ज राहण्याच्या सूचना -- बैठकीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (एनडीआरएफ) अधिकाऱ्यांनी तयारीबाबत माहिती देताना सांगितले की, आपत्कालीन परिस्थितीत एनडीआरएफचे ३ चमू सज्ज राहातील.
- पूर्व उपनगरासाठी अतिरिक्त चमू तैनात ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. भारतीय नौदलालाही त्यांच्या चमू आणि पाणबुडे (डायव्हर्स) यासह सुसज्ज राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. अग्निशमन दलालाही सज्ज राहण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले.