मुंबई : आरे परिसरामध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातातील गंभीर जखमी झालेल्या वृंदा रितेश मोदी (वय ३२) यांचे शनिवारी निधन झाले. तेरा दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ११ डिसेंबरला झालेल्या या अपघातात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टरमधील सहायक संजीव शंकर (३१) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रितेश मोदी हे पत्नीसह ‘अमन एव्हिएशन’ कंपनीच्या हेलिकॉफ्टरमधून ‘जॉय राइड’ घेत असताना, अचानकपणे बिघाड झाल्याने, ते आरे कॉलनीतील फिल्टरपाडा परिसरात कोसळले. यामध्ये प्रफुल्लकुमार मिश्रा (वय ५३) जागीच ठार झाले होते, तर मोदी दाम्पत्य व सहायक वैमानिक संजीव शंकर यांना हेलिकॉप्टरला लागलेल्या आगीमुळे गंभीर जखमा झाल्या. त्याचप्रमाणे, शरीराच्या अनेक भागांत दुखापत झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असताना, घटनेच्या तीन दिवसांनी रितेश मोदी यांचे निधन झाले. रॉबिन्सन व्हीटीपीएचबी-आर-४४४ बनावटीच्या या हेलिकॉप्टरच्या दुर्घटनाप्रकरणाचा तपास हवाई वाहतूक नियंत्रण तपास केंद्राकडून (एएआयबी) करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जखमी महिलेचा मृत्यू
By admin | Published: December 26, 2016 4:54 AM