मुंबई : शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह गेल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचा यंदा पहिलाच दसरा मेळावा होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दसरा मेळावा होत असल्याने राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होत आहे. यावेळी विधानपरिषदेचे नेते अंबादास दानवे यांनी मेळाव्याला संबोधित केले. अंबादास दानवे यांनी राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारी रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूवरून अंबादास दानवे यांनी शिंदे सरकारवर टीका केली. मृत्यू घरात येतोय आणि सरकार लोकांच्या दारी जात आहे, असे अंबादास दानवे म्हणाले. तसेच, दसरा मेळावा एकच एकच असतो. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा. दसरा मेळावा मर्दाचा असतो. हे मर्द महाराष्ट्रात पुन्हा एकदा भगवा फडकवणार आहेत, गद्दारांनी दिल्लीची चाकरी करावी, असे अंबादास दानवे म्हणाले.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे देखील हाल आहेत. जुना कापूस अजून शेतकऱ्यांच्या घरात आहेत. नवीन कापूस आला मात्र शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही, असे अंबादास दानवे म्हणाले. तसेच, महाराष्ट्रात पापींचे राज्य आहे. त्यामुळे निसर्ग देखील कोपतो आहे. राज्यात दुष्काळ आहे. एक रुपयाच्या पिक विम्याचे गाजर देण्यात आले. मात्र विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असे अंबादास दानवे म्हणाले.