बिबट्यांचा मृत्यू विषप्रयोगाने नाहीच, गोरेगाव, कलिना प्रयोगशाळेच्या शवविच्छेदन अहवालात विसंगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 02:33 AM2018-11-16T02:33:57+5:302018-11-16T02:34:17+5:30
बिबट्यांचा मृत्यू विषप्रयोगाने नाही, मग कोणत्या कारणाने झाला?
मुंबई : बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन बिबट्यांचा दोन महिन्यांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. मात्र, कलिना न्यायवैद्यक प्रयोगशाळेने शवविच्छेदन अहवाल नुकताच सादर करून त्यात सांगितले की, नॅशनल पार्कातील दोन बिबट्यांचा मृत्यू विषप्रयोगाने झाला नव्हता. हे नमूद करताना बिबट्याचा मृत्यू नेमका कशाने झाला? हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. परिणामी, बिबट्याचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला, असा प्रश्न प्राणिमित्रांनी उपस्थित केला आहे.
दहा वर्षीय सूरज नावाच्या बिबट्याच्या श्वसनप्रक्रियेमध्ये विषबाधेने बिघाड झाला. त्यानंतर दहा वर्षीय भंडारा नावाच्या नर बिबट्याचाही विषबाधेने मृत्यू झाला. गोरेगाव येथील सरकारी पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या शवविच्छेदनात दोन्ही बिबट्यांच्या शरीरात विषाचे अंश आढळले होते. या बिबट्यांवर विषप्रयोग झाल्याचा आरोप प्राणिमित्रांनी केला होता. या आरोपांमुळे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी करण्याचा निर्णय उद्यान प्रशासनाने घेतला होता. कलिना येथील सरकारी प्रयोगशाळेत नमुन्यांची तपासणी करण्यात आली. मृत बिबट्यांच्या व्हिसेरात विष आढळले नाही, असे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक व मुख्य वनसंरक्षक अन्वर अहमद यांनी सांगितले की, दोन्ही बिबट्यांच्या गोरेगाव आणि कलिना येथील शवविच्छेदन अहवालात विसंगती दिसून येते. याबाबत तज्ज्ञांकडून माहिती घेण्यासाठी डॉक्टरांकडून अहवालाचा अभिप्राय मागण्यात आला आहे. त्यानंतर वरिष्ठांशी चर्चा करून त्यावर निर्णय घेतला जाईल. वन्यजीवांच्या क्षेत्रात उद्यान प्रशासनाने नवीन दर्जात्मक प्रणाली बसविली आहे. वन्यजीवांच्या क्षेत्रात प्रवेश करणाºया प्रत्येक व्यक्तीची सर्व माहिती घेऊन मगच त्याला प्रवेश दिला जाणार आहे. या उपाययोजना वन्यजीवांच्या परिसरात अवलंबल्या आहेत, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.
सूरज बिबट्याचे पोट, आतडी, प्लीहा, यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस आणि हृदयात विष आढळले नाही. तसेच भंडारा बिबट्याच्या आतडी, जठर, फुप्फुस, यकृत, प्लीहा, मेंदू, मूत्रपिंडे आणि उलटीच्या नमुन्यातही विष आढळले नाही, असा अहवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेने सादर केला.