आॅक्टोबरमध्ये मलेरियाचा एक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 05:24 AM2018-10-18T05:24:23+5:302018-10-18T05:24:54+5:30

मुंबई पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा अहवाल : पहिल्या पंधरवड्यातील माहिती, डेंग्यूसदृश ३ हजार २९३ रुग्ण आढळले

A death of malaria in October | आॅक्टोबरमध्ये मलेरियाचा एक बळी

आॅक्टोबरमध्ये मलेरियाचा एक बळी

Next

मुंबई : मुंबईत पावसाने दडी मारली असून साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. पावसानंतर मलेरिया, डेंग्यूची साथ पसरली असून १ ते १५ या कालावधीत मलेरियामुळे वाकोला येथील ३९ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. याशिवाय, पंधरवड्यात ३ हजार २९३ डेंग्यूसदृश रुग्ण आढळले आहेत.
वाकोला पाइपलाइन येथे राहणाऱ्या ३९ वर्षीय पुरुषाला ८ आॅक्टोबरला एका रुग्णालयात दाखल केले. त्यांना ३ ते ४ दिवसांपासून थंडी-ताप, अंगदुखी असा त्रास होत होता. तसेच, या रुग्णाला तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन होते. शिवाय ते मानसिक तणावाखाली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर, त्यांना अशक्तपणा आणि मलेरियाची लागण झाल्याचे निदान झाले. या रुग्णाचा त्याच दिवशी मृत्यू झाला.
पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, १५ आॅक्टोबर २०१८ पर्यंत मलेरिया रुग्णांची संख्या २०५ एवढी आहे. तर, सप्टेंबरमध्ये एकूण ६२५ मलेरियाचे रुग्ण आढळले होते. या पंधरवड्यात मलेरियामुळे एकाला जीव गमवावा लागला. सोबतच डेंग्यूच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. आॅक्टोबरच्या पंधरवड्यात १८४ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. तर, सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे ३९८ रुग्ण आढळले असून ५ जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आॅक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात १४ ते ६० वयोगटातील १३० पुरुषांना तर, ५४ महिलांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे. तसेच २५ ते २९ या वयोगटातील एकूण १०८ रुग्ण आढळले आहेत. गॅस्ट्रोच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. या पंधरवड्यात २५७ गॅस्ट्रोचे रुग्ण आढळले आहेत. तर, गेल्या वर्षी याच कालावधीत ५४६ गॅस्ट्रोचे रुग्ण आढळले होते. रस्त्यावरील तेलकट, तूपकट पदार्थ खाणे टाळले पाहिजे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Web Title: A death of malaria in October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.