लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या तरुणाने लाथ मारल्याने 'त्या' ट्रॅकमनचा मृत्यू?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 11:27 AM2018-07-26T11:27:01+5:302018-07-26T11:27:48+5:30
स्टंट करताना त्याने लाथ मारल्यामुळे श्रावण दुसऱ्या रुळावरून येणा-या लोकलच्या धडकेत जखमी झाला.
मुंबई : पश्चिम रेल्वेवर दादर हद्दीतील रेल्वे रुळादरम्यान काम करत असताना, श्रावण लक्ष्मण सानप या ट्रॅकमनचे अपघाती निधन झाले. मात्र, ट्रॅकमनच्या निधनामुळे पश्चिम रेल्वे आणि रेल्वे पोलीस आमन-सामने झाल्याचे दिसून आले.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांच्या माहितीनुसार, श्रावण हा रेल्वे रुळावर काम करत असताना, ट्रेनमधील एक प्रवासी एका पायावर उभे राहण्याचा स्टंट करत होता. स्टंट करताना त्याने लाथ मारल्यामुळे श्रावण दुसऱ्या रुळावरून येणा-या लोकलच्या धडकेत जखमी झाला. त्याला उपचारासाठी नायर रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी या घटनेची नोंद अपघाती मृत्यू म्हणून केली आहे. संबंधित मोटारमनच्या जबाबानुसार, बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अप धिम्या मार्गावर एकूण आठ ट्रॅकमन काम करत होते. या वेळी लोकल ५० किमी प्रतितास वेगाने धावत होती. ट्रॅकमनला हॉर्न देत बाजूला होण्याचा इशारा दिला. यामुळे सहा ट्रॅकमन दुस-या बाजूला गेले व २ ट्रॅकमन तेथेच उभे राहिले. लोकल अगदी जवळ आल्यानंतर दोघांपैकी श्रावण यांनी खाली वाकण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांच्या डोक्याला धावत्या लोकलचा फटका बसल्याने ते जखमी झाले. दरम्यान, समाज माध्यमांवर प्रवाशांच्या स्टंटमुळे ट्रॅकमनचा मृत्यू झाल्याचा संदेश व्हायरल झाला होता