मुंबई: इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून वाजेद काझी नावाच्या प्लंबरचा मृत्यू झाला. हा प्रकार गुरुवारी चारकोप परिसरात घडत असून पोलिसांनी या इमारतीचा कंत्राटदार सदानंद रामुगडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
तक्रारदार फरीन काझी (२९) या मालवणीच्या गेट क्रमांक ७ याठिकाणी पती आणि कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांचे पती जॉन्सन क्लिनिक कंपनीत प्लंबिंगचे काम करत होते. फरीन यांच्या तक्रारीनुसार, वाजेद ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता चारकोपच्या भाब्रेकर नगर मध्ये असलेल्या acme अव्हेन्यू इमारतीमध्ये ७ व्या मजल्यावर एका खोलीच्या किचनमधील प्लंबिंग चे काम करत होते. काम करताना १० ते १०.३० च्या सुमारास ते बोल जाऊन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या पोडियम पार्किंग स्लॅबवर पडले. गंभीर जखमी झाल्याने त्यांना शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून दाखलपूर्व मयत घोषित केले. जॉन्सन क्लिनिकचा कंत्राटदार रामुगडे याने व्यक्तिगत सुरक्षा व साधने न पुरवल्याने वाजेद यांचा निष्पाप बळी गेला. या विरोधात त्यांच्या पत्नीने तक्रार दिल्यावर भारतीय दंड संहिता कलम ३०४- ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.