जाळून घेतलेल्या बलात्कारपीडित महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 02:34 PM2024-03-08T14:34:26+5:302024-03-08T14:34:49+5:30
जिशान बेग (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. मात्र, महिलेसोबत लग्न केले नव्हते. महिलेने २९ जानेवारीला विक्रोळी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवत, आरोपीला अटक केली.
मुंबई : विक्रोळीत राहणाऱ्या एका ३४ वर्षीय बलात्कारपीडित महिलेने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
जिशान बेग (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. मात्र, महिलेसोबत लग्न केले नव्हते. महिलेने २९ जानेवारीला विक्रोळी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवत, आरोपीला अटक केली. प्रेमसंबंध असताना आरोपीने महिलेकडून काही पैसेदेखील घेतले होते; मात्र, अटकेनंतर त्याने महिलेला हे सर्व पैसे परत देण्याचे आश्वासन देत केस मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार महिलेने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्याने, न्यायालयाने आरोपीची जामिनावर मुक्तता केली होती.
तुरुंगातून बाहेर येताच आरोपी हा महिलेला तिचे पैसे परत करणार होता. मात्र, अनेक दिवस उलटूनदेखील त्याने न दिल्याने २१ फेब्रुवारीला महिलेने अंगावर रॉकेल ओतून घेतले. तिच्या कुटुंबीयांनी तत्काळ तिला सायन रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी तिच्यावर १५ दिवस उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असताना ६ मार्चला महिलेचा मृत्यू झाला.