कासा : प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूस कारचालक डॉ. अनाहिता पंडोल यांचा निष्काळजीपणा तसेच भरधाव वेगात धोकादायकपणे वाहनाला ओव्हरटेक करणे कारणीभूत असल्याचे पोलिसांनी डहाणू सत्र न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात म्हटले आहे. निष्काळजीपणे कार चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा डॉ. पंडोल यांच्यावर आधीच दाखल झालेला आहे.
डहाणू तालुक्यातील चारोटी पुलाजवळ महामार्गावर ४ सप्टेंबरला दुपारी ३.०० वाजता उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघातात मृत्यू झाला होता. कार भरधाव वेगाने पुलाच्या कठड्याला आदळून झालेल्या अपघातात चार प्रवाशांपैकी मागे बसलेले सायरस मिस्त्री व जहांगीर पंडोल यांचा मृत्यू झाला होता, तर कारमध्ये पुढे बसलेल्या चालक डॉ. अनाहिता पंडोल व डरायस पंडोल हे जखमी झाले होते.पोलिसांनी या अपघाताबाबत कसून चौकशी सुरू केली होती. या अपघाताबाबत अनेक अंदाज व तर्कवितर्क बांधण्यात येत होते.
न्यायालयात दोषारोपपत्र दाखलपोलिसांच्या चौकशीअंती महिला कारचालक डॉ. अनाहिता पंडोल यांच्यावर दोन महिन्यांनंतर गुन्हा दाखल झाला होता. अपघाताची पूर्ण चौकशी करून चालकावर गाडी चालवताना निष्काळजीपणा दाखवल्याचे उघड झाले होते. तसेच या अपघातास धोकादायकपणे केलेले ओव्हरटेकिंग जबाबदार असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात कलम ३०४ (अ) लावण्यात आले आहे. याबाबतीत बुधवारी पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे.