मुंबई-उद्धव सेनेचे दक्षिण मुंबईचे विभाग क्रमांक १२ चे माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ (६१) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.कडवट व निष्ठावान शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती.शिवसेनेच्या अनेक आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता.२०१९ मध्ये त्यांनी मुंबादेवी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून त्यांची दक्षिण मुंबईचे विभाग क्रमांक १२ चे विभागप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.गेल्या काही दिवसांपासून पांडुरंग सकपाळ यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. आज संध्याकाळी चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या मागे पत्नी ,दोन मुलगे आणि सुना आहेत.
त्यांच्या निधनाची बातमी येथील खासदार अरविंद सावंत यांनी लोकमतला दिली.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावान शिवसैनिक व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निधडा पाईक होता.अतिशय निधड्या छातीचा हा शिवसैनिक सर्व आंदोलनात अग्रेसर असे.निवडणुक असो,का आंदोलन त्याचे पूर्ण आयोजन, नियोजन म्हणजे सकपाळ होते अश्या शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली.निवडणुकीच्या प्रचार फेरीत असतांना त्यांनी मला हार घेतला,गळाभेट घेतली तीच शेवटची पांडुरंगाची भेट होती या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.