Join us  

‘सीएसटी’ ऑफिसात उंदरांचा मृत्यू,  मोटरमन, गार्डची ड्युटी प्लॅटफॉर्मवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 8:16 AM

सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि चारसमोरील मोटरमन, गार्डच्या लॉबी परिसरात ९१ उंदीर मेले असून, या दुर्गंधीमुळे शुक्रवारी मोटरमन आणि गार्डना आपला कारभार फलाटावर थाटावा लागला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आगळ्यावेगळ्या बांधकाम शैलीमुळे देशविदेशात गाजलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक (सीएसएमटी) म्हणजे मुंबई-महाराष्ट्राची शान. या ठिकाणाहूनच लाखो मुंबईकरांना आपल्या पोटात सामावून घेत त्यांना त्यांच्या गंतव्य स्थानी सोडणाऱ्या लोकलचा कारभार हाकला जातो. मात्र, याच स्थानकात सध्या मृत उंदरांची प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे लोकल गाड्यांची ने-आण करणाऱ्या मोटरमन आणि गार्ड्सना चक्क प्लॅटफॉर्मवरूनच ड्युटी करावी लागत आहे. 

सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि चारसमोरील मोटरमन, गार्डच्या लॉबी परिसरात ९१ उंदीर मेले असून, या दुर्गंधीमुळे शुक्रवारी मोटरमन आणि गार्डना आपला कारभार फलाटावर थाटावा लागला होता. मृत उंदरांच्या दुर्गंधीमुळे प्रवासीही हैराण झाले असून फलाटावर आल्यावर आणि उतरल्यानंतर प्रवाशांना नाकाला रुमाल लावावा लागत आहे. मध्य रेल्वेचे व्यवस्थापक राम करण यादव यांनी शुक्रवारी स्थानक परिसरातील पायाभूत सेवा सुविधांच्या कामांची पाहणी करत त्या ठिकाणच्या अडचणी समजावून घेतल्या.

उंदीर नेमके किती मेले?गेल्या आठवडाभरापासून मृत उंदरांचा विषय चर्चिला जात आहे. या प्रकरणात साफसफाई करणाऱ्या एजन्सीला ५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अगदी सुरुवातीला मृत उंदरांचा आकडा १८ होता, अशी चर्चा होती. मात्र शुक्रवारी हा आकडा १२० ते १५० असावा, अशी चर्चा टर्मिनस परिसरात रंगली होती. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने मात्र मृत उंदरांची संख्या ९१ होती, असे म्हटले आहे.

 गेल्या आठवडाभरापासून सीएसएमटी परिसरात मृत उंदरांचा विषय सीएसएमटी स्थानकात चर्चिला जात आहे.  सोमवारी मोटरमन, गार्डच्या लॉबीमधून उंदीर मेल्याची दुर्गंधी येत होती. त्यामुळे साफसफाईसाठी कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाची बैठक व्यवस्था फलाटांवर मांडली.  लॉबीच्या साफसफाईनंतर मंगळवारी बैठक व्यवस्था पुन्हा लॉबीमध्ये हलविण्यात आली. मात्र, दुर्गंधी काही कमी होत नव्हती.  शुक्रवारी तर दुर्गंधी मोठ्या प्रमाणावर पसरली. त्यामुळे आता लॉबीमधील सगळ्या यंत्रणेची तोडफोड करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त या केबिनमागील आणखी दोन केबिनचे पीओपीसह साहित्य बाहेर हलविण्यात आले असून, येथील कर्मचाऱ्यांनीही टर्मिनसवर आपले बस्तान मांडले आहे. 

टॅग्स :लोकल