मुंबई : गटार साफ करण्यासाठी मॅनहोलमध्ये उतरलेल्या कामगाराला कार चालकाच्या बेदरकारीमुळे प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना रविवारी कांदिवलीच्या शंकर मंदिराजवळ असलेल्या शुभशांती सोसायटीजवळ घडली. यामध्ये जगवीर शामवीर यादव (२१) या कामगाराचा मृत्यू झाला. या संबंधात पोलिसांनी कारचालक विनोद उधवानी (६५) आणि संबंधित कंत्राटदार अर्जुनप्रसाद शुक्ला यांंना अटक करून नंतर जामिनावर सोडून देण्यात आले आहे. या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांदिवली पोलिसांच्या माहितीनुसार यादव आणि त्याची सहकारी देवी सिंग लोधी (६२) यांना अर्जुनप्रसाद शुक्ला या कंत्राटदाराने काम दिले होते. त्यानुसार नाला साफ करण्यासाठी शंकर मंदिराजवळ असलेल्या शुभशांती सोसायटीजवळ असलेल्या मॅनहोलमध्ये यादव उतरला होता. यादव नाल्याच्या आत असताना अचानक एक ह्युंदाई आय २० ही गाडी मॅनहोलवरून गेली ज्यामुळे यादव आत अडकला. ही कार विनोद उधवानी हा चालवीत होता. शुक्लाच्या म्हणण्यानुसार, चालकाला एक कुत्रा रस्त्यात दिसला. ज्यामुळे त्याचे लक्ष विचलित झाले असावे आणि त्याने चुकून मॅनहोलवरून गाडी नेली. त्यात यादवला धक्का बसला. यादवला तत्काळ रुग्णालयात नेले, परंतु उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
aयादवचा भाऊ राज याने दिलेल्या माहितीनुसार, आमच्या कुटुंबात जगवीर हा एकटाच कमावता होता. आमचे वडील अंध असून, आमची एक बहीणसुद्धा दृष्टिहीन आहे. शिवाय, इतर दोन बहिणींचे विवाह व्हायचे असून, त्यांच्यासाठी जगवीर पैसेही जमा करीत होता.