केईएममधील स्वच्छतागृहात एकाचा मृत्यू

By Admin | Published: March 17, 2016 02:21 AM2016-03-17T02:21:26+5:302016-03-17T02:21:26+5:30

पत्नीला उपचारासाठी केईएम रुग्णालयात घेऊन आलेल्या दत्तात्रय कांबळे (७२) यांचा स्वच्छतागृहात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

Death of one in a clean-up room in KEM | केईएममधील स्वच्छतागृहात एकाचा मृत्यू

केईएममधील स्वच्छतागृहात एकाचा मृत्यू

googlenewsNext

मुंबई : पत्नीला उपचारासाठी केईएम रुग्णालयात घेऊन आलेल्या दत्तात्रय कांबळे (७२) यांचा स्वच्छतागृहात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. स्वच्छतागृहात गेल्यावर मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे दत्तात्रय यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे. या घटनेची भोईवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
करी रोड येथे राहणारे दत्तात्रय कांबळे हे पत्नीसह मंगळवारी केईएम रुग्णालयात आले होते. त्यांच्या पत्नीला मूत्रपिंडाचा विकार आहे. गेल्या २ वर्षांपासून रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नेहमीप्रमाणे ते दोघे मंगळवारी केईएम रुग्णालयात आले. बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतल्यावर दुपारी साडेतीनच्या सुमारास औषधे घेण्यासाठी विभाग क्रमांक ३१ मध्ये दत्तात्रय गेले. औषधांसाठी रांगेत उभे असताना त्यांची पत्नी तेथे आली. त्या वेळी ‘मी लघवीला जाऊन येतो, तू रांगेत उभी राहा’ असे त्यांनी पत्नीला सांगितले.
दत्तात्रय हे लघवीसाठी पहिल्या मजल्यावरच्या मेडिसीन बाह्यरुग्ण विभागाच्या स्वच्छतागृहात गेले. त्यांची पत्नी औषधे घेऊन त्यांची वाट पाहत बसली होती. सायंकाळी ६ वाजेपर्यंत दत्तात्रय परत न आल्याने त्या एकट्याच घरी गेल्या. त्यांनी ही माहिती मुलगा संदीपला दिल्यानंतर त्यानेही रुग्णालयात येऊन त्यांचा शोध घेतला.
वडील कुठेच आढळून न आल्याने संदीपने ही माहिती रुग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणेला दिली. रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात दत्तात्रय यांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर भोईवाडा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार देण्यात आली. सकाळी साडेनऊच्या सुमारास रुग्णालयातून फोन आल्यानंतर वडिलांचे निधन झाल्याची बातमी त्यांच्या कुटुंबीयांना मिळाली. (प्रतिनिधी)

दत्तात्रय कांबळे हे स्वच्छतागृहात गेले असताना त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला. अशा स्थितीत काही सेकंदातच व्यक्ती बेशुद्धावस्थेत जाते. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातही मेंदूत झालेल्या रक्तस्रावामुळे मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.
- डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

Web Title: Death of one in a clean-up room in KEM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.