मुंबई : अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या पायाभरणी समारंभाला जाणारी स्पीड बोट दगडावर आपटल्याने २५ जणांचा जीव धोक्यात आला होता. मात्र वेळीच दुसरी बोट आल्याने २४ जणांचे प्राण वाचले. चार्टर्ड अकाउंटंट सिद्धेश पवार (रा. गुणदे, जि. रत्नागिरी) हा ३६ वर्षांचा तरुण मात्र बुडून मरण पावला. त्याच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाखांची मदत जाहीर केली. या घटनेमुळे पायाभरणीचा कार्यक्रम रद्द केला. शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यासह मुख्य सचिव डी. के. जैन व अनेक वरिष्ठ अधिकारी, भाजपाचे राज पुरोहित व पत्रकारांना कार्यक्रमाला नेण्यासाठी चार बोटींची व्यवस्था करण्यात आली होती. दोन बोटींत पत्रकारव शिवसंग्रामचे कार्यकर्ते, तिसºया बोटीत अधिकारी व आ. मेटे तर चौथ्या बोटीत बांधकाम विभागाचे अधिकारी होते.गेट वे आॅफ इंडिया येथून या बोटी निघाल्या. अधिकारी व नेत्यांना नेणारी स्पीड बोट वेगाने पुढे गेल्याने पत्रकार व कार्यकर्ते असलेल्या बोटीने ‘शॉर्टकट’ घेण्यासाठी कुलाबा दीपस्तंभापासून वळसा घेतला. मात्र तेथेच बोट दगडावर आपटल्याने तिच्यात पाणी शिरले. पण रेस्क्यू बोट तत्काळ आल्याने २४ जणांचे प्राण वाचले. बुडालेल्या एकाचा शोधासाठी तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. बुडालेल्या सिद्धेश पवार यांचा मृतदेह रात्री हाती लागला.
शिवस्मारकाच्या पायाभरणीला जाणारी बोट बुडून एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 6:25 AM