Join us

संजय गांधी उद्यानात पलाश वाघाचा मृत्यू

By admin | Published: October 05, 2016 5:17 AM

मूत्रपिंडे निकामी झाल्याचे निदान झालेल्या येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘पलाश’ या वाघाचे मंगळवारी पहाटे निधन झाले.

मुंबई : मूत्रपिंडे निकामी झाल्याचे निदान झालेल्या येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘पलाश’ या वाघाचे मंगळवारी पहाटे निधन झाले. जागतिक प्राणिदिनी ‘पलाश’ने प्राण सोडावेत, या दैवदुर्विलासाने प्राणिमित्र हळहळले. ‘रॉयल बेंगाल’ जातीचा पलाश १३ वर्षांचा होता. तीन वर्षांचा असताना त्याला मध्य प्रदेशातून येथे आणण्यात आले होते. त्याच्या पश्चात त्याने जन्माला घातलेली ‘यश’, ‘आनंद’, ‘लक्ष्मी’ आणि ‘पूजा’ ही चार अपत्ये आहेत. रणथंबोर अभयारण्याची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मछली’ वाघिणीचे अलीकडेच वयाच्या १९ व्या वर्षी निधन झाले होते. तिच्यानंतर ‘पलाश’ हा भारतातील सर्वात वृद्ध वाघ म्हणून ओळखला जायचा. वाघांचे आयुष्यमान सरासरी १५ वर्षांचे अपेक्षित असते. गेले अनेक दिवस प्रकृती गंभीर असलेल्या ‘पलाश’चे मंगळवारी पहाटे ३.१५ वाजता निधन झाले, असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यक अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, ‘गेले तीन-चार दिवस ‘पलाश’ची प्रकृती खूपच खालावली होती. तो काहीच खात नव्हता. त्याची मूत्रपिंडे पूर्णपणे निकामी झाल्याचे निष्पन्न झाले. रक्ताची तपासणी केली असता, सेरम क्रिएटिनिनचे प्रमाण ३१ मिग्रॅ एवढे प्रचंड वाढल्याचे दिसून आले.’ (विशेष प्रतिनिधी)