सुट्या पैशांअभावी रुग्णाचा मृत्यू
By Admin | Published: November 17, 2016 06:50 AM2016-11-17T06:50:11+5:302016-11-17T06:50:11+5:30
केंद्र सरकारने ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयामुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना सुटे पैसे नसल्याचा फटका
मीरा रोड : केंद्र सरकारने ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयामुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना सुटे पैसे नसल्याचा फटका विविध मार्गांनी बसतो आहे. बँकेच्या रांगेत उभे असलेले भाईंदरमधील दीपकभाई शाह (५३) यांचा बुधवारी सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला; तर मंगळवारी रुग्णाच्या नातेवाईकांकडे ७०० रुपये सुटे नसल्याने उपचारास नकार दिल्याचा आरोप रूग्णाच्या नातलगांनी केला. याबाबत भूमिका समजून घेण्यासाठी डॉक्टरांना फोन केला असता, त्यांनी तो उचलला पण ‘राँग नंबर’ असल्याचे सांगून कट केला.
भार्इंदर पश्चिमेला असलेल्या शिवसेना गल्लीतील हमीरमल कुटीरमध्ये पत्नी, ११ वर्षाची मुलगी व ६ वर्षांच्या मुलासह राहणाऱ्या कार्तिक ऊर्फ लाला रमेश शाह (३६) यांना ह्दयविकाराचा त्रास होता. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील घरी जात असताना त्यांना इमारतीच्या तळ मजल्यावरच चक्कर आली आणि ते खाली कोसळले.
रहिवाशांनी कार्तिक यांचे फॅमिली डॉक्टर असलेल्या जवळच्याच भावेश इमारतीमधील डॉक्टर संगीता परमार यांच्याकडे उपचारासाठी नेले. त्यावर परमार यांनी ७०० रुपये फी होईल, असे सांगितले आणि ५००, १००० च्या नोटा घेण्यास नकार दिला. उपचाराचे ७०० रुपये सुटे दिल्याशिवाय उपचारासाठी येणार नाही, असेही त्या म्हणाल्याचे नातलगांचे म्हणणे आहे.
७०० रुपये सुटे नेऊन दिल्यानंतर डॉ. परमार या तपासणीसाठी आल्या. परंतु तोपर्यंत कार्तिकचा यांचा मृत्यू झाला. त्यामुळे कार्तिक यांचे कुटुंबीय संतापले, तसेच डॉ. परमार यांच्याविरोधात तीव्र नाराजीचे वातावरण आहे. डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्याने कार्तिकचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईंकांनी केला आहे. (प्रतिनिधी)