- मनोहर कुंभेजकरमुंबई - अंधेरी पश्चिम येथील ब्रह्मकुमारी ग्लोबल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या (बीएसएस एमजी) चुकीच्या उपचारांमुळे मंदार वेलणकर (४२) यांचा हकनाक मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. वेलणकर यांच्या पत्नी मीनाक्षी वेलणकर यांनी हॉस्पिटल प्रशासनाकडे डॉक्टरसह नर्सिंग स्टाफच्या अनेक तक्रारी केल्या होत्या. मात्र हॉस्पिटल प्रशासनाने या प्रकरणी काहीही कारवाई केलेली नाही. मात्र हे प्रकरण महिला व बाल हक्क समितीकडे गेल्यानंतर समितीने या हॉस्पिटल प्रशासनाला धारेवर धरले.या हॉस्पिटलचा हलगर्जीपणा मीनाक्षी वेलणकर यांनी महिला, बाल हक्क आणि विकास समितीच्या अध्यक्षा आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्यासमोर आणला. या प्रकरणी समितीने या हॉस्पिटलला भेट देऊन संपूर्ण प्रकरण जाणून घेतले. या वेळीही मीनाक्षी वेलणकर यांनी पतीचा जीव डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच गेल्याचा आरोप पुन्हा केला. त्यानंतर डॉक्टर, हॉस्पिटल नर्सिंग स्टाफ आणि हॉस्पिटल प्रशासनाची चौकशी करून कारवाईचे आदेश लव्हेकर यांनी दिले.कांदिवलीत राहणाऱ्या मंदार वेलणकर यांना ‘सर्व्हायकल स्पॉन्डयलायटिस’चा त्रास होता. ४ नोव्हेंबर २०१७ रोजी पाठीच्या दुखण्याची तक्रार घेऊन वेलणकर दाम्पत्य बीएसईएस हॉस्पिटल येथे आले होते. त्यांना २५ आॅक्टोबर २०१७ रोजी ब्रह्मकुमारी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मंदार यांच्यावर हॉस्पिटलमधील डॉ. शशांक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बीएसईएसमध्ये उपचार सुरू होते. तेव्हा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल, असे डॉ. जोशी यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र शस्त्रक्रियेनंतर वेलणकर यांच्या शरीराचा डावा भाग लुळा पडला. याबद्दल डॉक्टर जोशी यांच्याकडे विचारणा करूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याचे मीनाक्षी वेलणकर यांनी सांगितले. मंदार यांना सलग ३ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्यानंतर त्यांच्या डोक्याची कवटी काढावी लागेल, असा सल्ला डॉक्टर शशांक जोशी यांनी दिला. त्यानंतर शस्त्रक्रियेद्वारे मंदार यांच्या डोक्याची कवटी काढण्यात आली. तीन दिवस मंदार यांना बँडेज गुंडाळून ठेवले होते. त्या वेळी कुटुंबीयांपैकी कोणालाच नर्सिंग स्टाफने मंदार वेलणकर यांच्याजवळ फिरकू दिले नसल्याची तक्रारही मीनाक्षी वेलणकर यांनी लव्हेकर यांच्याकडे केली. त्यातच पुढे वेलणकर यांचा मृत्यू झाला. समितीच्या भेटीवेळी हॉस्पिटलचे संचालक गैरहजर होते.जेव्हा मिलिंद वेलणकर यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, त्यावेळी त्यांची प्रकृती खूप चिंताजनकच होती. त्यांच्या मेंदूत गाठ असल्यामुळे तातडीने शत्रक्रिया करावी लागली. त्यांच्या मृत्यूला हॉस्पिटलचे डॉ. शशांक जोशी, नर्सेस आणि स्टाफ हे जबाबदार नाहीत. माधुरी वेलणकर यांनी केलेले आरोप चुकीचे व खोटे आहेत. याप्रकरणी हॉस्पिटलची बाजू मांडणारा सविस्तर अहवाल समिती अध्यक्ष व आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या कार्यालयात आम्ही दिला आहे. - डॉ.अशोक मेहता, संचालक, बीएसइएस हॉस्पिटल
ब्रह्मकुमारी ग्लोबल हॉस्पिटलच्या चुकीने रुग्णाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 4:36 AM