मुंबई : एका संकेतस्थळाच्या चित्रीकरणासाठी आणलेल्या एका पंचेचाळीस वर्षांच्या हत्तीणीचा मृत्यू झाला. याप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून आरे पोलीस तपास करत आहेत. कार्लसेल नामक एका संकेतस्थळावर या हत्तीणीचे फोटो टाकण्यात येणार होते. त्यासाठी दहिसरवरुन या हत्तीणीला तिचा मालक सदा पांडे घेऊन आले होते. गेल्या तीस वर्षांपासून पांडे तिला सांभाळत असल्याचे त्यांनी सांगितले. आरे पोलीस ठाण्याचे सहय्यक पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सातच्या नंतर हत्तीणीचे फोटोशुट करण्यात येणार होते. त्यासाठी तिला फिल्मसीटी परिसरातच पांडेने बसविले होते. मात्र सायंकाळी तिने बसल्या जागी अखेरचा श्वास घेतला. आम्ही याप्रकरणी डॉक्टरच्या अहवालाची वाट पाहत आहोत. जेणेकरून तिच्या मृत्यूचे नेमके कारण कळेल. तसेच यासाठी संकेतस्थळाच्या मालकाने संबंधित परवानगी मिळवली होती का याचीही चौकशी करत आहोत, असेही लोखंडे म्हणाले. मात्र प्रथमदर्शी तरी वृद्धत्वामुळे तिचा मृत्यू झाल्याचे त्यांनी नमुद केले. (प्रतिनिधी)
फिल्मसिटीत चित्रीकरणासाठी आणलेल्या हत्तीणीचा मृत्यू
By admin | Published: October 22, 2016 3:11 AM