मुंबई - मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात जन्मलेले पेंग्विनचे पिल्लू अल्पायुषी ठरले. 15 ऑगस्ट रोजी जन्मलेल्या पेंग्विनच्या पिल्लाचा 22 ऑगस्ट रोजी रात्री मृत्यू झाला. दक्षिण कोरियावरून आणलेल्या पेंग्वीनपैकी एका पेंग्वीनच्या अंड्यामधून या पेंग्विनचा जन्म झाला होता. त्यामुळे भारतात जन्मलेला पहिला पेंग्वीन होण्याचा मान या पेंग्विनला मिळाला होता. तसेच राणीच्या बागेत पेंग्वीनचा पाळणा हलल्याने येथील अधिकारी आणि कर्मचारी वर्गही आनंदित होता. मात्र या पेंग्वीनच्या मृत्यूमुळे हा आनंद अल्पकालिन ठरला आहे.
अडीच वर्षीय हेबोल्ट पेंग्विनच्या अंड्याला 15 ऑगस्ट रोजी 40 दिवस पूर्ण झाले होते. त्यामुळे स्वातंत्र्यदिनीच मुंबईतील पेंग्विन कुटुंबामध्ये चिमुकला पाहुण्याचे आगमन झाले होते.