कोव्हॅक्सिन चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू; उच्च न्यायालयात याचिका दाखल
By मुकेश चव्हाण | Published: January 17, 2021 09:24 AM2021-01-17T09:24:37+5:302021-01-17T09:40:05+5:30
लसीच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
मुंबई: कोरोना महामारीपासून सर्व देशवासियांना दिलासा देणाऱ्या आणि जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शनिवारी उद्घाटन करण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून बहुप्रतिक्षित असलेल्या कोरोना लसीच्या वापराला सुरुवात झाली आहे. मात्र, 'कोव्हॅक्सिन' या संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या लसीबाबत उपलब्ध माहितीच्या अभावामुळे लस घेणाऱ्यांना त्याच्या धोका संभवत असून लसीचा त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे सांगत या लसीच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
`कोव्हॅक्सिन' लसीची सुरक्षितता आणि कार्यक्षमतेच्या चाचणी परीणामांशी संबंधित निष्कर्षांची माहिती भारतीय औषध नियंत्रक जनरल (डीसीजीआय)ने सार्वजनिक करावी, अशी मागणी त्यांनी या याचिकेतून केली असून त्यावर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. हैदराबाद इथल्या भारत बायोटेकची `कोव्हॅक्सिन' लस सुरक्षित नसून जास्तीत जास्त प्रतिकारशक्ती प्रतिसाद प्रदान करते. याबाबत कंपनीने डीसीजीआयला दिलेला डेटा हा अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. तसेच या लसीच्या चाचणीचा तिसरा टप्प्या अद्याप पूर्ण झाला नसल्यामुळे कोव्हॅक्सिन लसीची गुणवत्ता अद्याप सिद्ध झालेली नाही, असा आरोप याचिकाकर्ते साकेत गोखले यांनी केला आहे.
भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन'ला अद्याप पूर्णपणे मान्यता मिळालेली नाही. कंपनीने त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीचे निष्कर्ष आणि आकडेवारी कुठेही कागदोपत्री प्रसिद्ध केलेली नाही. मात्र, ही आकडेवारी केंद्र सरकारला सादर करण्यात आली असून त्याच आधारे लसीचा सशर्त मंजुरीसाठी विचार करण्यात आला असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, मध्य प्रदेशात 'कोव्हॅक्सिन' चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून शवविच्छेदन अहवालानुसार, संदिग्ध विषबाधामुळे उद्भवलेल्या श्वसनच्या त्रासामुळे हा मृत्यू झाल्याचा दावाही याचिकाकर्त्याने या याचिकेतून केलेला आहे.
सार्वजनिक हित लक्षात घेता डीसीजीआयकडे लस उत्पादक कंपन्यांनी सादर केलेला डेटा आणि तज्ज्ञ समित्यांचा अंतिम अहवाल आणि 'कोवाक्सिन' विषयीची माहिती मिळविण्याकरता माहिती अधिकारांर्तगत याचिकाकर्त्यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्याला कोणतेही उत्तर न आल्यामुळे गोखले यांनी त्याविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सामान्य जनतेच्या हितासाठी तातडीने आरटीआय अर्जात विनंती केलेली माहिती देण्यासंदर्भात डीजीसीआयला निर्देश देण्याची विनंती न्यायालयाकडे या याचिकेतून करण्यात आली आहे.
'कोव्हॅक्सीन' टोचून घेण्यास डॉक्टरांचा नकार-
दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात लशीकरणाची मोहीम सुरू होण्याआधीच मोठी घडामोड समोर आली आहे. रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांनी 'कोव्हॅक्सीन' ऐवजी 'कोव्हिशील्ड' लस टोचली जावी अशी मागणी करणारं पत्र रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना लिहीलं आहे. दरम्यान, याबाबत रुग्णालयाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
डॉक्टरांनी लिहिलेल्या पत्रानुसार, राम मनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी कोव्हिशील्ड लशीची मागणी केली आहे. "रुग्णालयात आजपासून कोरोना लशीकरणाची मोहिम सुरु करण्यात येत असल्याचं आम्हाला कळलं. पण यात भारत बायोटेकने विकसीत केलेल्या कोव्हॅक्सीनची लस निवासी डॉक्टरांना देण्यात येणार आहे. पण कोव्हॅक्सीनच्या चाचण्या पूर्ण न झाल्यामुळे डॉक्टरांना या लशीबाबत काही शंका आहेत. याशिवाय यामुळे लशीकरणाचा मुख्य उद्देश देखील साध्य होणार नाही. त्यामुळे कोव्हॅक्सीन ऐवजी कोव्हिशील्ड लस डॉक्टरांना दिली जावी", असं डॉक्टरांनी पत्रात नमूद केलं आहे.