ऑक्सिजन अभावी रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 08:42 PM2020-07-16T20:42:57+5:302020-07-16T20:43:21+5:30
मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार उघडीस
कुलदीप घायवट
मुंबई : ऑक्सिजन सिलेंडरचा अपुरा पुरवठा झाल्याने कोरोना संक्रमित रेल्वे कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार उघडीस आला आहे. मध्य रेल्वे प्रशासनामधील या घटनेला जबाबदार असलेल्यावर कारवाई करण्याची मागणी रेल्वे कर्मचारी संघटनेनी केली आहे.
मध्य रेल्वेच्या कल्याण येथील अप यार्ड मधील ५७ वर्षीय कनिष्ठ कर्मीदल नियंत्रकाचा ऑक्सिजन सिलेंडर अभावी सोमवारी मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. १० जुलैपासून कनिष्ठ कर्मीदल नियंत्रक आजारी होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. श्वास घेण्यास जास्त त्रास झाल्याने त्यांना मध्य रेल्वेच्या कल्याण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ११ जुलै रोजी कोरोनाची तपासणी करण्यात आली. १२ जुलै सकाळी ११ वाजता त्याचा अहवाल कोरोना संक्रमित आला. कल्याण येथील रुग्णालयात असुविधा असून सुद्नधा १३ जुलैपर्यंत त्यांना कुठेही हलविण्यात आले नाही. त्यांना तत्काळ पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालय किंवा भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल रुग्णालयात पाठविण्यात आले नाही, असे म्हणणे रेल्वे कर्मचाऱ्यांनी मांडले.
कनिष्ठ कर्मीदल नियंत्रक यांची प्रकृती जास्त खालावली. त्यामुळे त्यांना १३ जुलै रोजी दुपारच्या सुमारास भायखळा येथील रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र कल्याणहून भायखळा येथे जाण्यासाठी एकाच छोट्या रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सिलेंडर लावून कनिष्ठ कर्मीदल नियंत्रकसह ५ जण कोरोना संक्रमित बसविण्यात आले. मृत्यूशी सामना करणाऱ्या रुग्णाला झोपण्यासाठी देखील जागा नव्हती. अर्ध्या रस्त्यातच त्यांचा ऑक्सिजन सिलेंडर संपला. इतर कोरोना संक्रमित रुग्णांनी ऑक्सिजन सिलेंडर हलवून ऑक्सिजन पुरविण्याचा प्रयत्न केला. रुग्णवाहिकेच्या चालकाने समयसूचकता दाखवून लवकरात लवकर रुग्णांना भायखळा रुग्णालयात पोहचविले. रुग्णालयात दाखल करून त्यांना सायंकाळी मृत घोषित करण्यात आले. ऑक्सिजन अभावी, निर्णय घेण्यात दिरंगाई, वेळेत उपचार न घेतल्याने, लवकर मुंबईतील रूग्णालयात न हलविल्याने कनिष्ठ कर्मीदल नियंत्रक यांचा मृत्यू झाला. या घटनेला जबाबदार असलेल्यावर कारवाई करण्याची मागणी ऑल इंडिया एस.सी/एस.टी. रेल्वे एम्प्लॉयइज असोशिएशन यांच्यावतीने करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे रुग्णालयातील भोंगळ आणि निष्काळजीपणाच्या कारभारामुळे रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन सिलेंडरच्या अभावामुळे मृत्यू होणे, हि दुर्देवी बाब आहे. महाव्यवस्थापकानी यामध्ये स्वता लक्ष द्यावे. जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची करावी, असे पत्र सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्यावतीने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांना देण्यात आले आहे.
----------------------------
मध्य रेल्वे प्रशासनाचा दिखाऊपणा
मध्य रेल्वे प्रशासन रेल्वे कर्मचार्यांना मास्क, हातमोजे देण्याच्या घोषणा करत आहे. मात्र, त्यांनी दिलेले मास्क आणि हातमोजे निरुपयोगी आहेत. मे महिन्यानंतर कोणालाही मास्क आणि हातमोजे दिले नाहीत. त्यामुळे कोरोना संक्रमित वाढत आहे. जगजीवन राम रुग्णालयात दररोज रेल्वेतील कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. नुकताच सीएमएमटी येथील स्टेशन मनेजर यांना कोरोनाचे संक्रमण होऊन मृत्यू झाला. तरी, मध्य रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात येत नाही, असा संताप रेल्वे कर्मचारी संघटनानी व्यक्त केला.
---------------------
मध्य रेल्वेचे वैद्यकीय कर्मचारी २४ तास काम करत आहेत. असा कोणताही प्रकार झालेला नाही. कर्मचाऱ्याचा मृत्यू कशाने झाला, हे तपासणीत उघडीस येईल. ऑक्सिजन संपल्याने मृत्यू झालेला नाही. रुग्णाची पाहिजे, तेवढी खबरदारी घेतली होती.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.