मुंबई : स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाकडून शौचालय बांधून त्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र गेली १५ वर्षे शौचालयाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुर्ला येथील महिलांना अद्यापही म्हाडा आणि रेल्वेच्या भांडणामुळे शौचालय बांधून मिळालेले नाही. परिणामी सात फुटांची भिंत पार करत या महिलांना उघड्यावर शौचासाठी जावे लागत आहे. त्यामुळे या महिलांमध्ये संतापाची भावना असून त्यांच्या समस्येची दखल न घेणाऱ्या म्हाडा व रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी महिलांनी केली आहे. कुर्ला पूर्व परिसरातील हार्बर रेल्वे लाइनलगत हनुमाननगर ही २०० झोपड्यांची वस्ती आहे. झोपडपट्टीप्रमाणे या ठिकाणी काही सुविधा पालिकेने देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र गेल्या १५ वर्षांपासून येथील रहिवाशांना सार्वजनिक शौचालय नसल्याने येथील पुरुषांना ट्रॅकजवळ जावे लागते तर महिलांना रेल्वेची सात फुटी भिंत पार करून एका उघड्या मैदानावर जावे लागते. परिसरात दुसरे सार्वजनिक शौचालय नसल्याने सात फूट उंच असलेल्या रेल्वेच्या सुरक्षा भिंतीवर एक लाकडी फळी ठेवण्यात आली आहे. या फळीच्या आधारे महिला ही भिंत पार करून उघड्या मैदानावर शौचविधीसाठी जातात. संतापजनक बाब म्हणजे वृद्ध महिलांना तर याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. या फळीवर चढताना दोन महिलांना सोबत घेऊन वृद्ध महिलांना जावे लागत आहे. अनेक वर्षांपासून या रहिवाशांची ही समस्या आहे. याबाबत स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार, महापालिका, म्हाडा व रेल्वेकडे पत्रव्यवहार करून ही समस्या सोडवण्याची विनंती केली. मात्र रेल्वे व म्हाडामध्ये जागेचा वाद असल्याने या प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप स्थानिक रहिवासी सलीम खान यांनी केला आहे. पालिका निवडणुकीपूर्वी येथे शौचालय न झाल्यास मतदानावर बहिष्काराचा निर्धार रहिवाशांनी केला आहे. (प्रतिनिधी)
कुर्ल्यातील महिलांच्या नशिबी जीवघेणी कसरत
By admin | Published: December 23, 2016 3:41 AM