लोकलच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू
By admin | Published: February 17, 2016 03:34 AM2016-02-17T03:34:52+5:302016-02-17T03:34:52+5:30
रूळ ओलांडताना लोकलची धडक लागून गौरव व्होरा (१३) या शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू होण्याची घटना सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळ घडली
मुंबई : रूळ ओलांडताना लोकलची धडक लागून गौरव व्होरा (१३) या शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू होण्याची घटना सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळ घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांकडून दुपारी एक तास रेल रोको करण्यात आला. त्यामुळे वाहतूक खोळंबून रेल्वे प्रवाशांचे हाल झाले.
हँकॉक पूल पाडल्यानंतर पालिका आणि रेल्वेकडून वाहतुकीसाठी कोणताही पर्याय देण्यात न आल्याने स्थानिकांना नाइलाजास्तव रूळ ओलांडावे लागत आहेत. यावर तोडगा काढावा, अशी मागणी या वेळी स्थानिकांकडून करण्यात आली.
सॅण्डहर्स्ट रोड येथील सेंट पिटर्स शाळेत आठवीत शिकणारा गौरव व्होरा हा परीक्षा देऊन सकाळी ११च्या सुमारास घरी परतत होता. सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील पाडण्यात आलेल्या हँकॉक पुलाच्या
बाजूने रूळ ओलांडत असताना
कल्याण दिशेला जाणाऱ्या जलद
लोकलची धडक गौरवला बसली.
रेल्वे पोलिसांच्या मदतीने नागरिकांनी जखमी गौरवला सीएसटीजवळील सेंट जॉर्ज रुग्णालयात नेले. मात्र तेथे गौरवला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघाताची माहिती मिळताच दुपारी पावणेएकच्या सुमारास सॅण्डहर्स्ट रोड स्टेशन परिसरातील नागरिक स्टेशनजवळ रेल्वे रुळालगत गोळा झाले आणि त्यांनी लोकल अडवून घोषणा देण्यास सुरुवात केली.