समीर वानखेडे यांना जिवे मारण्याची धमकी; बनावट ट्विटर अकाऊंटची चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 05:47 AM2022-08-20T05:47:39+5:302022-08-20T05:49:35+5:30

एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना जिवे मारण्याची धमकी ट्विटरवर देण्यात आली आहे.

death threat to ncb sameer wankhede and investigation of fake twitter account | समीर वानखेडे यांना जिवे मारण्याची धमकी; बनावट ट्विटर अकाऊंटची चौकशी

समीर वानखेडे यांना जिवे मारण्याची धमकी; बनावट ट्विटर अकाऊंटची चौकशी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना जिवे मारण्याची धमकी ट्विटरवर देण्यात आली आहे. शुक्रवारी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी त्यांनी गोरेगाव पोलिसांना माहिती दिली असून, अधिक तपास सुरू आहे.

वानखेडे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात गोरेगाव पोलिसात केलेल्या तक्रारीवरून, रविवारी अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाच्या मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून क्लीन चिट मिळाली आहे. वानखेडे यांनी चैत्यभूमीला नुकतीच भेट दिली. त्यानंतर त्यांना एका ट्विटर खात्यातून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून धमकीचे संदेश मिळत होते. ज्यात ‘हिसाब देना पडेगा, हमे सब पता है, तुम्हे हम खतम कर देंगे’ असे नमूद करण्यात आल्याचे वानखेडे यांचे म्हणणे आहे. त्यांना धमकविण्यासाठीच ते खाते तयार करण्यात आले असावे, असाही त्यांचा आरोप आहे. वानखेडे यांनी शुक्रवारी गोरेगाव पोलिसांची भेट घेतली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे गोरेगाव पोलिसांकडून सांगण्यात आले.
 
वानखेडे यांच्या बाजूने निकाल देताना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने ९१ पानी आदेशात वानखेडे हे मुस्लीम असल्याचा युक्तिवाद फेटाळून लावत जन्माने महार जातीतील असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला होता. त्यानंतर  मलिकांविरोधात वानखेडेंनी तक्रार दाखल केली. मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर त्यांनी वानखेडे यांच्या कुटुंबावर खोटे आरोप केल्याचे वानखेडे यांचे म्हणणे आहे.  मलिक यांनी आर्यन खान प्रकरणाचा फायदा घेतल्याचा आरोपही वानखेडे यांनी केला होता.

Web Title: death threat to ncb sameer wankhede and investigation of fake twitter account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.