राज्यात १२ जिल्ह्यांमध्ये मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:06 AM2021-05-28T04:06:01+5:302021-05-28T04:06:01+5:30
मुंबई : राज्यातील प्रमुख शहरांत कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असला तरीही १२ जिल्ह्यांमध्ये अजूनही मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक आहे. यात ...
मुंबई : राज्यातील प्रमुख शहरांत कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असला तरीही १२ जिल्ह्यांमध्ये अजूनही मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक आहे. यात सिंधुदुर्ग, नंदूरबार, बीड, परभणी, हिंगोली, वर्धा, वाशिम, चंद्रपूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे.
राज्याच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले, मृत्यूदर अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाही, किंवा तेथील मूलभूत आरोग्यसेवा - सुविधा अपुऱ्या आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा, आरोग्य यंत्रणांचा अभाव असल्यानेही मृत्यूदर वाढण्याचा धोका आहे. पहिल्या लाटेत या जिल्ह्यांतील संसर्गाची तीव्रता कमी होती. यंदाच्या लाटेत येथील रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणांवर अतिरिक्त ताण आल्याचे दिसून आले.
गडचिरोलीत २०२० साली ८७ मृत्यू होते, यंदा यात वाढ होऊन ३६१ मृत्यू झाले आहेत. मागील वर्षी ८ हजार ५०७ रुग्ण निदान झाले होते. यंदा याचे प्रमाण दुप्पट होऊन रुग्णसंख्या १९ हजार १४८वर पोहोचली आहे, तर दुसरीकडे नंदूरबार, सिंधुदुर्ग, हिंगोली, गडचिरोली, परभणी आणि वर्धा या जिल्ह्यात २०२० साली १० हजारांहून कमी रुग्ण दिसून आले होते. त्यात वाढ होऊन यंदा हे प्रमाण १३ ते ५० हजारांच्या घरात पोहोचले आहे.
मागील लाटेत नऊ जिल्ह्यांमध्ये मृत्यूदर हा ३ टक्के होता. यंदा आतापर्यंतचा सर्वाधिक मृत्यूदर कोल्हापूरमध्ये दिसून आला असून, याचे प्रमाण २.८९ टक्के आहे. बुलडाण्यात सर्वात कमी ०.३८ मृत्यूदराची नोंद झाली आहे. राज्याच्या एकूण मृत्यूदराचा विचार केला असता गेल्यावर्षी हे प्रमाण २.५६ टक्के होते, तर यंदा हा मृत्यूदर १.०८ आहे. २०२० सालच्या नऊ महिन्यांत १९.३२ लाख रुग्ण आणि ४९ हजार ५२१ मृत्यू झाले आहेत. यंदा पाच महिन्यांत ३६.६९ लाख रुग्ण आणि ३९ हजार ६९१ मृत्यूंची नोंद आहे.