मुंबई : फोर्ट येथील भानुशाली या दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील मृतांचा आकडा शुक्रवारी सायंकाळी १० झाला आहे. कुसुम पद्मलाल गुप्ता (४५), ज्योत्सना पद्मलाल गुप्ता (५०), पद्मलाल मेवालाल गुप्ता (५०), किरण धीरज मिश्रा (३५), मनिबेन नानजी फारिया (६२), शैलेश भालचंद्र कानडू (१७), प्रदिप चौरासिया (३५), रिकु चौरासिया (२५), कल्पेश नाझी तरिया (३२) अशी ९ मृतांची नावे असून, एका मृताची ओळख पटलेली नाही. तर २ जण जखमी झाले असून, नेहा गुप्ता आणि भालचंद्र कानडू अशी जखमींची नावे आहेत. नेहाची यांची प्रकृती चिंताजनक असून, भालचंद्र किरकोळ जखमी झाले आहेत.
गुरुवारी सायंकाळच्या सुमारास भानुशाली या तळमजली अधिक सहा मजली म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतीच्या एका बाजुचा भाग कोसळला होता. दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांसह मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या जवानांनी मदतकार्य हाती घेतले होते. ८ फायर इंजिन, २ रेस्क्यू व्हॅनच्या मदतीने शोधकार्य सुरु होते. या व्यतीरिक्त ५० कामगार, ६ जेसीबी, १० डंपर्स घटनास्थळी कार्यरत होते दरम्यान गुरुवारी रात्री ऊशिरापर्यंत मदत कार्य सुरु असतानाच येथे अग्निशमन दलाचे जवान दाखल होण्यापूर्वी २ जण सुखरुप यातून बाहेर पडली. अग्निशमन दलाने इमारतीच्या दुस-या भागात अडकलेल्या १३ जणांना सुखरुप बाहेर काढले. तर ढिगा-यातून ९ जणांना बाहेर काढण्यात आले.