लसीकरणाने मृत्यू, निपुत्रिक होण्याची अफवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:06 AM2021-06-02T04:06:25+5:302021-06-02T04:06:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील लसीकरणाचा कार्यक्रम अद्यापही म्हणावा तसा वेगवान झालेला नाही. लसीकरणाच्या तारखा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील लसीकरणाचा कार्यक्रम अद्यापही म्हणावा तसा वेगवान झालेला नाही. लसीकरणाच्या तारखा मिळविण्यापासून लस कुठे घ्यायची, कुठे नोंदणी करायची ? नोंदणी केली तर वेळेवर लस मिळणार का ? अशा अनेक प्रश्नांनी मुंबईकरांना त्रासले असतानाच दुसरीकडे मात्र लसीकरणामुळे मृत्यू होण्याच्या, निपुत्रिक होण्याच्या अफवांचे पीक उठले आहे. त्यामुळे किमान मुंबईत तरी लसीकरणाचा फज्जा उडाला असून, दुसरीकडे महापालिका मात्र लसीकरणाचा कार्यक्रम सुरळीत असल्याचा दावा सातत्याने करीत आहे.
कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मुंबई महापालिका आपल्या स्तरावर प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना आता यश येत असून, मुंबईतला कोरोनाचा प्रसार कमी झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, आजही मुंबईतल्या बहुतांश भागात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत तर दुसरीकडे लसीकरणाच्या कार्यक्रमाचा फज्जा उडाला आहे. लसीकरणासाठी नोंदणी होत नाही. झाली तर लस वेळेत मिळत नाही. लसीकरणासाठी व्यक्ती दाखल झाल्या तर साठा संपल्याची कारणे दिली जातात. अशावेळी ज्येष्ठ नागरिकांना लस न घेता परत जावे लागत आहे.
तिसरीकडे लस घेतली तर भलत्याच अफवांना सामोरे जावे लागत आहे. लस घेतल्याने मृत्यू होतो. लस घेतल्याने निपुत्रिक होण्याची भीती आहे. लसीकरणामुळे काही होणार नाही. त्यापेक्षा लस न घेतलेली बरी; अशा अनेक वावड्या उठविल्या जात आहेत. मात्र, महापालिका अशा वावड्यांना, अफवांना त्याच स्तरावर थोपविण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करीत आहे. यात समाज माध्यमांचा प्रामुख्याने वापर केला जात असून, लसीचे दुष्परिणाम नसल्याचे मुंबई महापालिकेकडून पटवून दिले जात आहे.
* त्रास होऊ शकतो; पण...
लस घेतल्यानंतर त्रास होऊ शकतो. पण हा त्रास साहजिक आहे. लस टोचून घेतल्यानंतर हलका ताप, चक्कर आणि उलट्या होणे, अंगदुखी, इंजेक्शन घेतलेल्या हाताला सूज येणे, वेदना जाणवणे, अशा समस्या जाणवू शकतात. पण यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. कुठल्याही दीर्घकालीन आजारावर एखाद्या व्यक्तीची औषधे सुरू असल्यास लस घ्यायला हरकत नाही. परंतु, हृदयासंबंधित आजार असल्याने रक्त पातळ होण्याचे औषध सुरू असल्यास अशा व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच लस घेणे गरजेचे आहे.
- डॉ. तुषार राणे, मेडिसिन एक्स्पर्ट
* लाेकांच्या मनात भीती आहे
लसबाबत लोकांच्या मनात भीती आहे. कोरोना लस घेतल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत असल्याने अनेकांच्या मनात संभ्रमाचे वातावरण आहे. याशिवाय अनेकांना असे वाटते की, कोरोना लसींमुळे शरीरावर साईट इफेक्ट होऊ शकतो. यामुळे लोक लस घेण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. याचा परिणाम लसीकरणाच्या वेगावर होतोय. मात्र, कोरोनाची लस अतिशय सुरक्षित असून यामुळे कोणताही विपरीत परिणाम आरोग्यावर होत नाही. लस घेतल्याने हृदविकार, मधुमेह, मायग्रेन, स्नायूंचे आजार आणि वंधत्व अशी कोणतीही समस्या जाणवत नाही. त्यामुळे लोकांनी मनात शंका न बाळगता लसीकरण करून घ्यावे.
- डॉ. राजरतन सदावर्ते, छातीरोग तज्ज्ञ
* दुसरी मात्रा घेण्यास विलंब झाला तर...
कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा (डोस) घेतलेल्या नागरिकांनीही चिंताग्रस्त होऊ नये. प्रथम मात्रा घेतल्यानंतर शरीरात पुरेशी प्रतिपिंडे (ॲण्टीबॉडीज) निर्माण होतात. त्यामुळे काही कारणाने दुसरी मात्रा घेण्यास थोडासा विलंब झाला तरी काळजी करू नये. तर अधिक वयोगटाच्या नागरिकांनी केंद्रांवर रांगेत उभे राहून गर्दी करू नये. गर्दी केल्याने संसर्ग फैलावण्याचा धोका वाढतो, ही बाब सर्वांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तसेच लसीकरण केंद्रांवर येताना आणि वावरताना एकावर एक असे दोन मास्क परिधान करावेत.
- मुंबई महापालिका
* कोरोनाशी लढण्यास मदत
लसीकरण सुरक्षित असून संसर्गाचा धोका कमी करते, असे अनेक क्लिनिकल टायल्सवरून समोर आले आहे. लसीचे डोस हे दोन टप्प्यात दिले जात आहेत. दुसरा डोस घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात आवश्यक ॲण्टीबॉडीज तयार होतात. ज्यामुळे कोरोनाशी लढण्यास मदत मिळते. लस घेतल्यानंतर तुम्हांला थकवा, डोकेदुखी, इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना, ताप, थंडी वाजणे किंवा लसीकरणानंतर शरीर दुखणे यासारखे दुष्परिणाम जाणवतील. पण घाबरून जाऊ नका. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. शंका असल्यास डॉक्टरांशी चर्चा करा.
* केंद्रात थांबविले जाते; कारण...
लसीबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. यामुळे बहुतेक लोक लस घेण्यासाठी पुढे येत नाहीत. ज्या लसी दिल्या जात आहेत, त्याने कोणतेही गंभीर साइड इफेक्ट्स होत नाहीत. किंचितसे दुखणे, दुसऱ्या दिवशी इंजेक्शनच्या जागी दंडावर सूज येते. ती दोन-तीन दिवसानंतर आपोआप कमी होते. काही व्यक्तींना दोन दिवस ताप येतो, अंग-हातपाय दुखतात, खूप गळून गेल्यासारखे वाटते. मात्र, ही लक्षणेही दोन-तीन दिवसांत त्वरित कमी होतात. क्वचित प्रसंगी गरगरते; पण त्यासाठी आपल्याला अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबविले जाते. मात्र, अनेकदा लस घेतल्यानंतरही काहीही त्रास जाणवत नाही.
* मुंबई महापालिकेचे म्हणणे काय ?
कोविड संसर्गाची स्थिती नियंत्रणात येत असल्याबाबत, प्रशासनाकडून आभासी चित्र उभे केले जात असल्याचे आरोप प्रसार आणि समाजमाध्यमांतून करण्यात आले आहेत. हे आरोप हे पूर्णपणे निराधार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
----------------