हाताच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 03:53 AM2019-11-23T03:53:49+5:302019-11-23T03:54:08+5:30
शताब्दी रुग्णालयातील घटना; डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप
मुंबई : खड्डा चुकविण्याच्या नादात झालेल्या किरकोळ अपघातात मालाडच्या प्रमिला मनोज देवरे या ३३ वर्षीय महिलेचा हात फ्रॅक्चर झाला. सुरुवातीला खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर शताब्दी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिच्या हातावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना भुलीचे इंजेक्शन दिले. त्यानंतर त्या शुद्धीवर आल्याच नाहीत. शुक्रवारी त्यांना मृत घोषित केले. प्रिन्स मृत्यू प्रकरण ताजे असतानाच घडलेल्या या प्रकारामुळे रुग्णांच्या कुटुंबीयांमध्ये तणाव आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच प्रमिला यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मालाड पश्चिमेकडील गुरव चाळीत प्रमिला या पती, एक मुलगा, मुलीसोबत राहायच्या. ९ तारखेला त्या दुचाकीवरून येत होत्या. त्याच दरम्यान खड्डा चुकविण्याच्या नादात त्या खाली कोसळल्या. उजव्या हाताला फ्रॅक्चर असल्याचे समजताच त्यांना १४ तारखेला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. १९ तारखेला त्यांना शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. तेथे भुलीचे इंजेक्शन दिले. मात्र त्यांना त्रास होत असल्याने डॉक्टरांनी आणखी एक भुलीचे इंजेक्शन दिले. त्यानंतर त्या बेशुद्ध झाल्या. त्यांच्या अंगाला सूजही येत असल्याचा आरोप पती मनोज यांनी केला आहे. त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आले. गुरुवारी त्यांच्या नाका-तोंडातून रक्त आले होते. शुक्रवारी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, असे कुटुंबीयांनी सांगितले. दरम्यान, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. त्यानुसार, पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती शताब्दी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद नगरकर यांनी दिली.
दोषींवर कारवाईची मागणी...
प्रमिला यांचा भाचा गणेश गुरव याने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, केवळ हाताला फ्रॅक्चर होते. त्या व्यवस्थित होत्या. वॉर्डमध्येही सर्वांशी हसून, बोलणे-चालणे सुरू होते. डॉक्टरांना भुलीच्या प्रमाणाचा अंदाज न आल्याने त्यांचा मत्यू झाला. त्यातही आम्हालाच चुकीची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करून दोषींवर कारवाई करावी. त्याच दोन्ही मुलांचा सांभाळ करीत होत्या. मुलगा आठवीला तर मुलगी सहावी इयत्तेत शिक्षण घेत आहे. त्यामुळे या मुलांचे कसे होणार? शासनाने याचाही विचार करायला हवा, असेही त्यांनी नमूद केले.
पोलिसांकडे तक्रार : प्रमिला यांचे पती मनोज यांनी कांदिवली पोलीस ठाण्यात या प्रकरणी लेखी तक्रार करीत संबंधित प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार, पोलीस अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करत जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसानी दिली.