पाच खंड, ३५ देश, २७० दिवस, ६८ हजार किलोमीटरचा थरारक प्रवास, देबाशिष घोष यांनी केली पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 09:41 PM2018-03-26T21:41:55+5:302018-03-26T21:47:46+5:30
ऊनं, वारा, पाऊस, बर्फ, वादळ आणि प्रतिकुल परिस्थितीवर मात करत मोटार सायकलस्वार देबाशिष घोष यांनी पाच खंड, ३५ देश, २७० दिवस, ६८ हजार किलोमीटरचा चित्त थरारक प्रवास यशस्वीरित्या सोमवारी पूर्ण केला.
मुंबई - ऊनं, वारा, पाऊस, बर्फ, वादळ आणि प्रतिकुल परिस्थितीवर मात करत मोटार सायकलस्वार देबाशिष घोष यांनी पाच खंड, ३५ देश, २७० दिवस, ६८ हजार किलोमीटरचा चित्त थरारक प्रवास यशस्वीरित्या सोमवारी पुर्ण केला. त्यांच्या ‘पृथ्वी प्रदक्षिणे’चा गोड शेवट सोमवारी मुंबईतल्या गोरेगाव येथील एका हॉटेलमध्ये झाला. यावेळी त्यांनी आपला प्रवास कथन केला; तो खास त्यांच्याच शब्दात.
२७० दिवसांच्या प्रवासात अनेक लोक भेटले. पण भाषेचा भेदभाव कुठे झाला नाही. जाती-पातीच्या पलीकडे मला सर्व देशातील नागरिकांनी मदत केली. रशियामध्ये राहणारा जगातला प्रसिध्द मोटारसायकल स्वार मार्शल किलर रशियात भेटला. संपुर्ण रशियातून प्रवास करताना त्यांची सोबत मिळाली. एका देशामध्ये पेट्रोल भरण्यासाठी क्रेडिट कार्ड स्वॅप करताना समस्या येत होत्या. त्यामुळे पेट्रोल दिले जात नव्हते. परंतु, त्या देशातील काही बाईकर्सनी मदत केली. तसेच काही देशात स्थानिक नागरिक आणि विदेशी नागरिकांना वेगळे नियम होते. या प्रवासात माझी बहिण आणि मोटार सायकलस्वार सहकारी धर्मेंद्र जैन यांची मदत मिळाली, अशी माहिती मोटार सायकल स्वार देबाशिष घोष यांनी सांगितली.
‘वन वर्ल्ड वन राईड २०१७’ मोहिमे अंतर्गत जगातील पाच खंड आणि ३५ देशात मोटार सायकलने २७० दिवसांत ६८ हजार किलोमीटरचा प्रवास देबाशिष घोष यांनी केला. गोरेगाव पूर्वेकडील एका हॉटेलमध्ये दुपारी ३ च्या सुमारास बाईक रायडिंग मोहिमेचा शेवट झाला. मुंबईत पोहोचल्यावर कुटुंब आणि मित्र परिवारांनी घोष यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. तसेच प्रवासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुभेच्छा दिल्या होत्या.
मोटारसायकल स्वार घोष यांनी १० जून २०१७ साली मुंबईतून प्रवासाला सुरुवात केली. मुंबई नॉर्थ इस्टर्न मार्गे म्यानमार, साऊथ चीन, मंगोलिया, रशिया, युरोप, पोलंड, जर्मनी, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, युएसए, आॅस्ट्रेलिया या देशातून प्रवास करुन पुन्हा आशिया खंडातून म्यानमार येथून विविध खंडांची सफारी करुन मुंबईत ते दाखल झाले. यावेळी, घोष म्हणाले की, प्रवासादरम्यान निस्वार्थ लोक भेटली. प्रवासात धर्मेंद्र जैन याचा अपघात झाला. या अपघातात त्याच्या हाताला मार लागला. परंतु, स्वप्न पुर्ण करण्याचे जुनून असल्याने विविध संकटांवर मात करुन प्रवास पुर्ण केला. भारतातील नॉर्थ इस्टर्न मार्ग हा प्रवासासाठी खतरनाक होता. तिथले रस्ते हे धोकादायक आहेत. त्यामुळे तिथे प्रवास करताना काळजीपूर्वक प्रवास करावा लागला.
प्रवासातल्या आठवणी
खूप दिवासांनी आईला भेटल्यावर जो आनंद झाला; तसाच आनंद देशाच्या सीमेवर आल्यावर झाला. रायडिंगच्या बाबतीत सगळ््यात चांगला देश युएसए आहे. रशियातील पीटरर्सबर्ग हे सगळ््यात सुंदर ठिकाण आहे. प्रवासात जीवाला जीव लावणारी माणसे भेटली. कोणत्याही प्रकारचा भेदभाव नव्हता. प्रवासात सगळे दिवस सारखेच होते. या आठवणी आयुष्यभर स्मरणात राहणाºया आहेत.