Join us

देवनार डम्पिंगवरील पुनर्वसनाचा मुद्दा वादात; मानखुर्द मतदारसंघात उमेदवारांना डोकेदुखी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 1:37 PM

देवनार विभागाचा काही भाग अणुशक्ती नगर मतदारसंघात, तर डम्पिंगचा भाग मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रात येतो. त्यामुळे मानखुर्द-शिवाजीनगर भागातून उभ्या राहणाऱ्या  महायुतीच्या उमेदवारासाठी पुनर्वसनाचा मुद्दा डोकेदुखी ठरू शकतो.

मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंडच्या काही भागावर धारावीतील अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचा मुद्दा आगामी विधानसभा निवडणुकीत मानखुर्द विधानसभा क्षेत्रात गाजण्याची चिन्हे आहेत. देवनार विभागाचा काही भाग अणुशक्ती नगर मतदारसंघात, तर डम्पिंगचा भाग मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रात येतो. त्यामुळे मानखुर्द-शिवाजीनगर भागातून उभ्या राहणाऱ्या  महायुतीच्या उमेदवारासाठी पुनर्वसनाचा मुद्दा डोकेदुखी ठरू शकतो.

 देवनार  डम्पिंग ग्राउंडच्या काही भागावर धारावीतील अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य सरकाराने दोनच दिवसांपूर्वी घेतला. त्यामुळे देवनार पुन्हा चर्चेत आले आहे. देवनार डम्पिंग बंद करण्याची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आहे. मात्र, डम्पिंग ग्राउंड अजून बंद करण्यास प्रशासनाला यश आलेले नाही.

वीज निर्मितीतून ६०० मेगावॅट वीज- देवनार डम्पिंंग येथे वीज निर्मितीचा प्रकल्पही सुरू केला जाणार आहे. दोन टप्प्यांत सुरू केल्या जाणाऱ्या या प्रकल्पातून ६०० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे. 

- डम्पिंग ग्राउंडच्या एकूणक्षेत्रफळापैकी काही भागांत पुनर्वसन आणि काही भागात वीज निर्मिती प्रकल्प अशी योजना आहे.

सोयी-सुविधांवर भारअनेक वर्षे देवनार डम्पिंंगवर कचरा साठवला जात असल्याने या भागातील जमिनीची गुणवत्ता ढासळली आहे. शिवाय हा भाग प्रदूषितही झाला आहे. अशा ठिकाणी लोकांसाठी घरे बांधणे संयुक्तिक नाही, असा सूर उमटत आहे.

 डम्पिंग ग्राउंडमुळे या भागातील पायाभूत सोयी-सुविधांवर आधीच ताण आहे. त्यातच हजारो नागरिकांचे पुनर्वसन केले जाणार असल्याने आधीच अपुऱ्या असलेल्या सोयी-सुविधांवर आणखी भार पडण्याची शक्यता आहे. 

देवनारवर आणखी किती भार टाकणार, हा मुद्दा उपस्थित होत आहे. पुनर्वसनाचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याने मानखुर्द मतदारसंघात महाविकास आघाडी या निर्णयाच्या विरोधात वातावरण तापवण्याचा प्रयत्न करणार, हे उघड आहे. त्यामुळे या भागातील महायुतीच्या उमेदवाराला डोकेदुखीचा सामना करावा लागेल, असे दिसते.

 

टॅग्स :कचरामुंबई महानगरपालिका