मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारवंत आणि जनसंघाचे अध्यक्ष दिवंगत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्यावरील समग्र वाङ्मय खरेदीचा राज्य सरकारचा निर्णय वादात अडकण्याची शक्यता आहे. हा साहित्य खंड केवळ हिंदी भाषेत उपलब्ध आहेत. त्यामुळे राज्यातील दहा हजार मराठी ग्रंथालयांच्या माथी हिंदी पुस्तकांचा संच मारला जाणार आहे.नवता प्रकाशनच्या कीर्तिकुमार शिंदे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सदर खंडाचा मराठी अनुवाद केला जाणार आहे का, असा सवाल केला आहे. दीनदयाळ उपाध्याय यांच्या साहित्याचे दहा हजार संच राज्य सरकारमार्फत खरेदी केले जाणार असून राज्यातील वाचनालयांना मोफत भेट म्हणून ते पाठवण्यात येणार आहेत. प्रत्येकीसहा हजार रुपयांचे हे संच राज्य सरकारला ३० टक्के सवलतीने मिळणार आहेत. नवी दिल्लीतील प्रभात प्रकाशनाकडून ही खरेदी केली जाणार असून त्यासाठी सुमारे चार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, मराठीत हे खंड उपलब्ध नाहीत. शिवाय, सध्या हे खंड फक्त हिंदीतच उपलब्ध असून त्यांच्या इंग्रजी अनुवादाचे काम सुरू आहे. मराठी अनुवादाबाबत कसलीच कल्पना नसल्याचे नवता प्रकाशनने सांगितल्याचे कीर्तिकुमार शिंदे यांनी सांगितले. या पुस्तकांचा मराठी अनुवाद नसेलच तर राज्यातील ग्रामीण भागातल्या १०-१२ हजार ‘मराठी’ वाचनालयांमध्ये ‘हिंदी’ पुस्तके मोफत वाटण्यामागे सरकारचा काय हेतू आहे, असा प्रश्न शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. शिवाय, हे साहित्य मराठीत अनुवादित केले जाणार आहे का, अशी विचारणाही त्यांनी केली आहे. चार कोटी रुपयांच्या या पुस्तक खरेदीच्या मुद्द्यात मनसेनेही उडी घेतली असून यावर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दीनदयाळ उपाध्याय यांच्या वाङ्मयाच्या खरेदीवरून वाद, मुख्यमंत्र्यांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 1:56 AM