अकोला : विदर्भातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील इस्त्रायल शेतीचा प्रयोग पुढे नेण्यासाठी या विद्यापीठाला अपयश आले असले तरी, विदर्भातील अनेक शेतकर्यांनी इस्त्रायल सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञान अवगत केले आहे. त्याअनुषंगाने कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी इस्त्रायल शेतीचे तंत्रज्ञान अवगत करण्यावर पुन्हा भर दिला आहे.माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कार्यकाळात कृषी विद्यापीठात दोनशे हेक्टरवर उच्च घनता कापूस लागवड करण्यात आली होती. यासाठी या दोनशे हेक्टरवर इस्त्रायल तंत्रज्ञानाचा अर्थात सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्यात आला होता. तसेच विद्यापीठाच्या कापूस संशोधन क्षेत्रावर प्रयोगशाळाही उभारण्यात आली होती. संगणक प्रणालीद्वारे या शेतीला लागणार्या पाण्याचे नियोजन करण्यात येत होते. खते व इतर रासायनिक औषधांची फवारणीसुद्धा याच तंत्रज्ञानाद्वारे केली जात होती. इस्त्रायलचे शास्त्रज्ञ या सर्व प्रणालीची देखरेख करीत असल्याने, या विद्यापीठातील शास्त्रज्ञांना या उच्च घनता कापूस लागवडीचा फायदा तर झालाच, शिवाय या तंत्रज्ञानामुळे कापसाचे उत्पादन हेक्टरी ३५ ते ४0 क्विंटलपर्यंत पोहोचले होते. दरम्यान, आधुनिक शेतीचे हे तंत्रज्ञान येथील सामान्य शेतकर्यांना परवडणारे नसल्याची आवई त्यावेळी उठविण्यात आली आणि कोट्यवधी रुपये खर्चून कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर उभारण्यात आलेल्या या तंत्रज्ञानाचा बट्टय़ाबोळ झाला. आजही विद्यापिठात या तंत्रज्ञानाचे भग्न अवशेष पडून आहेत; परंतु आता येथील शास्त्रज्ञांचा या शेतीकडे कल पुन्हा वाढला असून, या तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी ह्यइस्त्रायल शेती तंत्रज्ञान व भारतीय शेतीची वर्तमानातून दुसर्या हरितक्रांतीकडे वाटचालह्ण या विषयावर परिसंवाद ठेवून कृषी विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांचे प्रबोधनही करण्यात आले. * केवळ ३0 मिमी पावसात शेतकरी समृद्ध राज्यात आतापर्यंत सिंचन विकासावर ७0 हजार कोटी खर्च झाले; तथापि सिंचनाची आकडेवारी पुढे सरकली नाही. दक्षिण इस्त्रायल प्रांतात केवळ ३0 मिमी पाऊस पडतो; परंतु येथील शेतकरी समृद्ध आहे. म्हणूनच इस्त्रालय तंत्रज्ञानाकडे येथील शास्त्रज्ञांचा कल पुन्हा वाढत आहे.बॉक्स*इस्त्रायल शेतीचे अनुकरणकृषी विद्यापीठातील या सूक्ष्म सिंचन शेतीचे प्रात्यक्षिक बघून त्यावेळी विदर्भातील अनेक शेतकर्यांनी ठिबक सिंचन शेती केली आहे. त्याचे फायदे आजही अनेक शेतकरी घेत आहेत.
*इस्त्रायल शेतीमुळे खरोखरच कापसाचे हेक्टरी उत्पादन ४0 क्विंटलपर्यंत पोहोचले होते; परंतु आपल्याकडील गरीब शेतकर्यांना हे तंत्रज्ञान परवडणारे नसल्याने, त्याकडे कानाडोळा करण्यात आला. असे असले तरी, अनेक शेतकर्यांनी या तंत्रज्ञानाद्वारे उत्तम ठिबक सिंचन सुरू केलेले आहे.- डॉ. शरदराव निंबाळकर,माजी कुलगुरू डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअकोला.