Join us

कमला नेहरू पार्क येथील अशोक स्तंभाखालीही डेब्रिजचा खच

By admin | Published: July 17, 2017 1:38 AM

वाळकेश्वर येथील कमला नेहरू पार्कमधील अशोक स्तंभाखाली डेब्रिजचा खच पडला आहे. वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वाळकेश्वर येथील कमला नेहरू पार्कमधील अशोक स्तंभाखाली डेब्रिजचा खच पडला आहे. वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा यांनी महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे पत्रव्यवहारही केला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या उद्यानाच्या एका बाजूच्या भागाचे नूतनीकरणाचे काम गेल्या ४-५ महिन्यांपासून संथगतीने चालू आहे. या कामांमुळे उद्यान नागरिकांसाठी बंद आहे, परंतु हे काम सुरू असताना डेब्रिज आणि बांधकामाचा राडारोडा कंत्राटदाराने अशोक स्तंभाखाली टाकला आहे.महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्यासोबत पिमेंटा यांनी यासंदर्भात पत्रव्यवहारही केला. याची दखल घेत, आयुक्तांनी सहायक आयुक्त देवीदास क्षीरसागर यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले, परंतु कमला नेहरू उद्यान जल अभियंत्यांच्या अखत्यारीत येत असल्याने, क्षीरसागर यांनी याची माहिती जल अभियंता अशोककुमार तवाडिया यांना दिली आणि दखल घेण्यास सांगितले. दरम्यान, हे उद्यान जल अभियंत्याच्या अखत्यारीत येत असल्याने, याबाबत अधिक माहितीसाठी जल अभियंत्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तथापि, अशोक स्तंभाखाली साचलेला डेब्रिजचा ढीग लवकरात लवकर हटवावा, अशी मागणी पिमेंटा यांनी केली आहे.