Join us

मँग्रोजवर डेब्रिजचा भराव

By admin | Published: May 25, 2014 3:28 AM

वाशीतील नैसर्गिक नाल्याजवळ डेब्रिजचे डंपिंग ग्राऊंड तयार झाले आहे. रोज शेकडो डंपर खाली केले जात आहेत.

नवी मुंबई : वाशीतील नैसर्गिक नाल्याजवळ डेब्रिजचे डंपिंग ग्राऊंड तयार झाले आहे. रोज शेकडो डंपर खाली केले जात आहेत. यामुळे नाल्याचे व येथील मँग्रोजचे अस्तीत्व धोक्यात आले असून महापालिकेसह सिडकोचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करू लागले आहेत. नवी मुंबईमध्ये डेब्रीजचा प्रश्न गंभीर होवू लागला आहे. मुंबई व ठाणेमधील डेब्रीज माफीया रोज शेकडो डंपर वाहने शहरातील रोड, नाले व मोकळ्या भूखंडावर खाली करत आहेत. शहरातील बांधकामांचा कचराही जागा मिळेल तेथे टाकला जात आहे. सायन - पनवेल महामार्गावर वाशी व सानपाडाच्या मध्यभागी नाल्याजवळही काही महिन्यांपासून डेब्रीजचे डंपींग ग्राऊंड तयार झाले आहे. एपीएमसी व सेक्टर १७ मधून येणार्‍या मुख्य नैसर्गीक नाल्याच्या कडेला शेकडो डंपर कचरा खाली केला जात आहे. यासाठी दिवसरात्र यंत्रणा राबत आहे. डंपर खाली केला की जेसीबीच्या सहाय्याने कचरा सर्वत्र पसरला जात आहे. नैसर्गिक नाल्याच्या कडेला असणारे मँग्रोजचे अस्तीत्व संपविले जात आहे. नाल्याच्या आकारावरही परिणाम होवू लागला आहे. नैसर्गीक नाल्यावर सुरू असलेल्या अतिक्रमणाकडे महापालिका व सिडको प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी याविषयी तक्रारी केल्या आहेत. लोकमतनेही यापूर्वी यावर आवाज उठविला होता. याविषयी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काही दिवस डेब्रीज माफिया परागंदा झाले होते. परंतू आता पुन्हा मोठ्याप्रमाणात डेब्रीज टाकले जात आहे. दिवसरात्र यंत्रणा कार्यरत असताना अधिकारी काहीच कारवाई करत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. अधिकार्‍यांचा या अतिक्रमणास पाठिंबा असल्याशिवाय असा प्रकार होवूच शकत नाही असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. याविषयी माहिती घेण्यासाठी अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त अजीज शेख यांच्याशी संपर्क साधला परंतु संपर्क होवू शकला नाही. (प्रतिनिधी)