लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ आज पहाटे दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कसलेही नुकसान झालेले नाही.
शनिवार पासून लोणावळा व खंडाळा घाट परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. रात्री पावसाच्या सोबत वारादेखिल असल्याने खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ डोंगराचा काही भाग सरकून द्रुतगती मार्गावर आला आहे. यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतुक मंदावली होती. घटनेची माहिती समजताच खोपोली बोरघाट पोलीस व आयआरबीची मदत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीला या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळावर दाखल झाले असून मार्गावरील दरड बाजुला करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. याकामाकरिता मुंबईकडे जाणारी वाहतुक थांबविण्यात आली आहे.
मागील दोन तीन वर्षापुर्वी याच भागात मोठ्या दरडी पडल्याने कोट्यावधी रुपये खर्च करत याभागातील डोंगराला सुरक्षा जाळी बसविण्यात आली आहे. तरी देखिल दरडी कोसळत असल्याने घाट परिसरातून प्रवास करताना प्रवाश्यांना व वाहन चालकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो आहे.