मालवणीत गुंडांनी केली घरांची मोडतोड, नागरिक भीतीच्या छायेखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 03:12 AM2019-05-08T03:12:02+5:302019-05-08T03:12:23+5:30

मालवणीत गुंडांकडून एका सोसायटीतील घरांच्या छताची मोडतोड करण्यात आल्याने परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे.

Debris of the houses done by the goons in the city of Malvandi, and the civic fears under shadow | मालवणीत गुंडांनी केली घरांची मोडतोड, नागरिक भीतीच्या छायेखाली

मालवणीत गुंडांनी केली घरांची मोडतोड, नागरिक भीतीच्या छायेखाली

googlenewsNext

मुंबई : मालवणीत गुंडांकडून एका सोसायटीतील घरांच्या छताची मोडतोड करण्यात आल्याने परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. मात्र, घराच्या दुरुस्तीचा खर्च परवडण्यासारखा नसल्याने भर पावसाळ्यात आम्ही उघड्यावर राहायचे का, असा सवाल पीडितांकडून विचारला जात आहे.

चिकुवाडी परिसरातील सिद्धिविनायक वेल्फेअर सोसायटीमध्ये तक्रारदार कॅथरीन कुटिनाल राहतात. त्या सोसायटीच्या सेक्रेटरी असून, खासगी शिकवण्या घेतात. ११ मार्च २०१९ ला राजकुमार चौधरी उर्फ पप्पू, विकी चौधरी, आरिफ खान आणि त्यांचे साथीदार सोसायटीत गेले. तेथील लोकांना काहीच न सांगता त्यांनी त्यांच्या घराचे पत्रे काढण्यास सुरुवात केली. सोसायटीतील घरांवर आणखी खोल्या बांधून त्या विकण्याचा डाव या टोळक्याचा होता. कॅथलीन कुटिनाल आणि अन्य स्थानिक महिलांनी गुंडांना जाब विचारला असता, त्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच एकीच्या श्रीमुखातही भडकावली. स्थानिकांनी या प्रकाराबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानुसार मालवणी पोलीस घटनास्थळी दाखल
झाले. मात्र, गुंडांना न ताब्यात घेता त्यांनी कॅथलीन आणि अन्य महिलांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना काही वेळाने सोडण्यात आले. यादरम्यान गुंडांनी त्यांच्या घरांचे पत्रे काढत साहित्याची तोडफोडही केली.

‘वरून’ दबाव आल्यानंतर कारवाई?
या सर्व प्रकाराबाबत पोलीस आणि पालिका आयुक्त तसेच अन्य अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून कळविण्यात आले. त्यानंतर मालवणी पोलिसांनी महिलांना मारहाण करणाऱ्यांविरोधात विनयभंग आणि संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केल्याचे कॅथलीन यांनी सांगितले.
मात्र या गुंडांनी घराचे नुकसान केले त्याची दुरुस्ती करण्याचा खर्च आम्हाला परवडण्यासारखा नाही. त्यामुळे पावसाळा डोक्यावर असताना घर असूनही उघड्यावर पडण्याची चिंता सतावत आहे. तसेच या गुंडांची दहशत आजही महिलांमध्ये असून त्यासाठी पालिकेने काही ठोस कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

आम्ही या प्रकरणी गुन्हा दाखल करत सर्व आरोपींना अटक केली आहे. स्थानिकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी आमच्याकडे यावे.
- दीपक फटांगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस ठाणे.

Web Title: Debris of the houses done by the goons in the city of Malvandi, and the civic fears under shadow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.