पुन:प्रक्रिया प्रकल्प लवकरच
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बांधकाम आणि दुरुस्तीच्या कामामुळे मुंबईत दररोज साचणाऱ्या १२०० मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावणे मुंबई पालिकेसाठी मोठे आव्हान ठरत आहे. या ढिगाऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कॉन्स्ट्रक्शन अँड डेमॉलिशन (सी अँड डी ) प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्या धर्तीवर हा प्रकल्प तयार केला जाणार आहे. त्यानंतर डेब्रिजची समस्या सुटेल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यावर अनधिकृतपणे डेब्रिज टाकले जाते. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने ‘कॉल ऑन डेब्रिज’ ही सशुल्क सेवा सुरू केली. हा कचरा उचलण्याचे काम वर्षानुवर्षे त्याच ठेकेदाराला दिले जात आहे. या ठेकेदाराने आतापर्यंत किती डेब्रिज उचलले याची माहिती द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. मुंबईत सर्वत्र सीसीटीव्ही असताना अनधिकृत डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा सवाल भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला. काँग्रेसचे असिफ झकेरिया, राजुल पटेल यांनी ही योजनाच फेल गेल्याचा आरोप केला. याबाबत पालिकेने सविस्तर अहवाल द्यावा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.
मुंबईत सुरू असणारी बांधकामे आणि दुरुस्तीच्या कामांमुळे दररोज तब्बल ८०० ते १२०० मेट्रिक टन डेब्रिज तयार होते. डेब्रिजची विल्हेवाट लावणे ही मोठी समस्या मुंबईच नव्हेतर, संपूर्ण महानगर प्रदेशाला भेडसावत असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितले. डेब्रिजच्या विल्हेवाटीसाठी पालिका लवकरच प्रोसेसिंग युनिट सुरू करणार आहे. दिल्ली, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी अशा प्रकारचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर मुंबईत डेब्रिजच्या विल्हेवाटीसाठी काम केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
* मुंबईत दररोज साडेसहा हजार मेट्रिक टन कचरा जमा होता. बांधकामे आणि दुरुस्तीच्या कामांमुळे दररोज तब्बल ८०० ते १२०० मेट्रिक टन डेब्रिज तयार होते.
* डेब्रिजची विल्हेवाट लावणे ही मोठी समस्या मुंबईच नव्हेतर, संपूर्ण महानगर प्रदेशाला भेडसावत आहे.
* डेब्रिज उचलण्यासाठी ‘डेब्रिज ऑन कॉल’ ही सशुल्क सेवा महापालिकेने सुरू केली आहे.