मुंबई : कांजूरमार्ग येथील कचरा प्रक्रिया केंद्रावरील राडारोडा (डेब्रिज) परस्पर मुलुंड डम्पिंग ग्राउंडला वळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठेकेदार कांजूरमार्ग कचरा प्रक्रिया केंद्रावर डेब्रिज टाकण्यासाठी खासगी विकासकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम स्वीकारत असल्याचा संशय पालिकेतील विविध पक्षांच्या गटनेत्यांना आहे. त्यामुळे आता पालिकेत डेब्रिज घोटाळा समोर येण्याची शक्यता आहे.कांजूरमार्ग येथील कचरा प्रक्रिया केंद्रावर पालिकेने दररोज दोन हजार मेट्रिक टन डेब्रिज पुरविणे अपेक्षित आहे़ ठेकेदाराबरोबर झालेल्या करारानुसार हे डेब्रिज पुरवले जाते, परंतु प्रत्यक्षात येथील आठशे मेट्रिक टन डेब्रिज मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर परस्पर रवाना करण्यात येत आहे आणि खासगी बांधकाम व्यावसायिकांकडून येणारे डेब्रिज पालिकेच्या कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येत आहे. या प्रकारामुळे ठेकेदाराला डेब्रिजच्या कामात गैरव्यवहाराची मुक्त संधी मिळाली आहे. ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर या संपूर्ण कामाचे आॅडिट करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत़दररोज ८०० मेट्रिक टन डेब्रिज मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येत असल्यामुळे त्या डम्पिंग ग्राउंडवरचा ताण वाढला आहे आणि कांजूरमार्ग कचरा प्रक्रिया केंद्राचा वापर पूर्ण क्षमतेने होण्यात अडथळे येत आहेत. शिवाय यामुळे ठेकेदाराला खासगी विकासकांकडून डेब्रिजच्या विल्हेवाटीसाठी अव्वाच्या सव्वा रक्कम उकळण्यासाठी मोकळे रान मिळाले आहे. (प्रतिनिधी)डेब्रिजची विल्हेवाट लावणे हे विकासकांसाठी डोकेदुखीचे काम असते. त्यामुळे डेब्रिजने भरलेल्या एका डंपरच्या विल्हेवाटीसाठी विकासक किमान एक ते दीड हजार रुपये मोजण्यास तयार असतात़ त्यामुळे येथील ठेकेदार खासगी विकासकाडून डेब्रिजचे पैसे घेऊन डम्पिंग ग्राउंडची गरज भागवत असल्याचा संशय गटनेत्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला़ ही बाब उघडकीस येताच आयुक्तांनी या कामाच्या आॅडिटचे आदेश घनकचरा विभागाला दिल्याचे समजते़
पालिकेत डेब्रिज घोटाळा ?
By admin | Published: December 23, 2015 12:55 AM