- मनीषा म्हात्रे मुंबई : पत्नीच्या उपचारासाठी मित्रांकडून पैशांची व्यवस्था न झाल्याने एका नामांकित हॉटेलमध्ये सुपरवायझर असलेल्या तरुणाने इन्स्टंट लोन ॲपचा आधार घेतला. ५० हजारऐवजी पाच हजार रुपये खात्यात जमा झाले. ठरल्याप्रमाणे व्याजासहित कर्जाची परतफेड केली. मात्र, मॉर्फ केलेले फोटो मित्रमंडळींना शेअर करण्याबरोबर, धमकी, शिवीगाळचे तब्बल २५० कॉल करून सव्वाचार लाख रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार चुनाभट्टीमध्ये समोर आला आहे. य वसुलीसाठी कर्जबाजारी झाल्याने तरुणाने चुनाभट्टी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी फसवणुकीसह बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
चुनाभट्टी परिसरात राहणारा अमित (नावात बदल) एका नामांकित हॉटेलमध्ये सुपरवायझर म्हणून नोकरी करून मित्रांसोबत राहतो. कुटुंबीय नागपूर येथे राहण्यास आहे. पत्नीची प्रकृती बिघडल्याने त्यांनी मित्रांकडून पैशांची मागणी केली. मात्र, पैशांची व्यवस्था न झाल्याने त्यांनी, २८ मार्च रोजी कॅश बस नावाचे लोन अॅप डाउनलोड केले. त्यामध्ये सर्व तपशील भरून ५० हजार रुपयांच्या कर्जाची आवश्यकता असल्याबाबत नमूद केले. ९० दिवसांच्या आत कर्ज मंजूर होणार असल्याबाबत संदेश मोबाईलवर आला.
संदेशावर क्लिक करताच खात्यात ५० हजारऐवजी ५ हजार रुपये जमा झाल्याचे दिसून आले. त्यापाठोपाठ ७ दिवसांच्या आत ८ हजार २०० रुपये परत करण्याबाबत वेगवेगळ्या लिंक मोबाईलवर येण्यास सुरुवात झाली. त्यानुसार, २ एप्रिल रोजी त्यांनी ८ हजार २०० रुपये ट्रान्सफर केले. मात्र, पैसे देऊनदेशील वाढीव पैशांसाठी तगादा सुरु झाला. फोटो मॉर्फ करून ते मित्रमंडळींना पाठवून बदनामीची धमकी, शिवीगाळ सुरू झाली. त्यांनी दुर्लक्ष करताच, त्यांचे मॉर्फ केलेले फोटो, व्हिडीओ त्यांना वेगवेगळ्या क्रमांकावरून पाठवण्यास सुरुवात झाली. संबंधित क्रमांक ब्लॉक करताच अन्य क्रमांकावरून शिवीगाळ धमकीचा कॉल येत होता. जवळपास ठगांच्या २०० ते २५० कॉलमुळे मानसिक ताण वाढला.
पोलीस ठाण्यात घेतली धाव
आधीच पत्नीच्या उपचाराच्या खर्चामुळे तणावात असताना, ठगांच्या मानसिक छळाला बळी पडून, समाजात प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून ते वेगवेगळ्या क्रमांकावरून त्यांना पैसे पाठवत होते. पुढे पैशांची मागणी पूर्ण न करताच, त्यांनी मॉर्फ केलेले फोटो व्हॉट्सॲपमधील सर्व मंडळींना पाठवले. स्वतःकडील सर्व रक्कम संपली. त्यात, कर्जाचा डोंगर वाढत असल्याने त्यांनी पोलिसांत धाव तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी त्यांचे समुपदेशन करत फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. त्यांनी पाठवलेल्या पैशांबाबत अधिक तपास करत आहे.
१६ ॲप डाउनलोड करण्यास भाग
अन्य लोन ॲप्लिकेशनवरून लोन घेऊन पैसे देण्यासाठी दबाव वाढला. एक नाही तर तब्बल १६ ॲप त्यांना डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्यांनी जवळील सर्व वस्तू गहाण ठेवून सव्वा चार लाख पुरवले.