मुंबई : कर्जमाफीची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करण्यासाठी पहिल्या टप्प्याच्या ग्रीन लिस्टमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणींवर माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि बँकांच्या पथकांनी एकत्रित बसून तोडगा काढावा आणि यादीतील बिनचूक माहिती असलेल्या शेतक-यांच्या खात्यावर गुरुवारपासून रक्कम जमा करण्यास सुरुवात करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले.कर्जमाफीची रक्कम जमा करताना झालेल्या घोळामुळे आणि अनेक तांत्रिक अडचणींमुळे राज्यभरातून तक्रारी येताच मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी तातडीने राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक घेतली. त्यास सहकारमंत्री सुभाष देशमुखही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांतील सहकारी बँका आणि सहकार उपायुक्तांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या.१८ आॅक्टोबरला साडेआठ लाख शेतकºयांची ग्रीन लिस्ट तयार करण्यात आली. त्यामध्ये एकाच व्यक्तीच्या नावे दोन वेगवेगळी खाती असल्याचे समोर आले. त्यातच दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे पात्र शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम हस्तांतरित होण्यास विलंब झाला. बैठकीत त्यावर सविस्तर चर्चा झाली. बँकांच्या माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञांनी राज्य शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या संपर्कात राहून एकत्रितपणे अडचणी दूर कराव्यात.बँकेने एक तंत्रज्ञ हा राज्य माहिती तंत्रज्ञान विभागाकडे नेमावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.पुण्यात मुख्यालय असलेल्या बँकांसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाने आपल्याकडील तांत्रिक मनुष्यबळ तेथे द्यावे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच प्रश्न सोडविता येतील, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस. संधू, राज्य बँकर्स समितीचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कर्जमाफीची रक्कम आजपासून जमा होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 6:09 AM