मुंबई : वरळीच्या गांधीनगर येथील शिवसंकल्प एस.आर.ए. को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या इमारत क्रमांक ५ मध्ये राहणाऱ्या ललिता तिरुगनना संबनधहम (७७) यांची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांच्या पेडर रोड परिसरात राहणाऱ्या बालषण्मुगम कुप्पूस्वामी (५३) या मुलाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बालषण्मुगमची पत्नी जीएसटी विभागात क्लास टू ऑफिसर आहे. बालषण्मुगम हे स्वतः एका बड्या कंपनीत कामाला होते. एप्रिल महिन्यात त्यांची नोकरी सुटली. डोक्यावर ३६ लाखांचे कर्ज होते. नोकरी सुटल्याने बँकेचा हफ्ता भरू शकत नव्हते. शुक्रवारी ते आईला भेटण्यासाठी आले. त्यांनी पत्नीला कॉल करून आत्महत्येचा विचार येत असल्याचे सांगितले. त्यानंतर शनिवारी पत्नीने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॉल घेतला नाही.
अखेर पत्नीने वरळीतील घर गाठले असता आई आणि मुलगा दोघेही बेशुद्धावस्थेत दिसून आले. दोघांना रुग्णालयात नेले. तेथे ललिता यांना मृत घोषित करण्यात आले. चौकशीत, बालषण्मुगम यानेच त्याच्यावर झालेल्या कर्जामुळे आईच्या तोंडावर रुमाल ठेवून हाताने नाक तोंड दाबून हत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर स्वतःवर वार करत हत्येचा प्रयत्न केला.
आईच्या संमतीनेच... घटनास्थळावरून पोलिसांना चार सुसाइड नोट हाती लागल्या आहेत. पत्नी, मुलीसह वरळी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नावाने या सुसाइड नोट आहेत. डोक्यावर कर्जाचा डोंगर असून बँकेचा हफ्ता भरणे शक्य होत नाही. मी तणावात आहे. आईचे भविष्यात काय होणार, त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे बालषण्मुगम यांनी सुसाइड नोटमध्ये नमूद केले आहे.