कर्जमाफीची प्रमाणपत्रे दिली, खात्यात पैसे गेलेच नाहीत, सत्ताधारी नेते, मंत्री चिंतित
By अतुल कुलकर्णी | Published: October 26, 2017 06:07 AM2017-10-26T06:07:31+5:302017-10-26T06:07:41+5:30
मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारने गाजावाजा करून दिवाळीत कर्जमाफीची प्रमाणपत्रे शेतक-यांना दिली, वित्त विभागाने १४ हजार कोटी रुपये सहकार विभागाकडे वर्ग केले.
मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारने गाजावाजा करून दिवाळीत कर्जमाफीची प्रमाणपत्रे शेतक-यांना दिली, वित्त विभागाने १४ हजार कोटी रुपये सहकार विभागाकडे वर्ग केले. पण दिवाळी संपूनही शेतक-यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही. त्यामुळे राज्यात पुन्हा सरकारविरोधी वातावरण तयार झाले आहे. ते कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक घेतली आणि बिनचूक खात्यावर तातडीने पैसे जमा करा, अशा सूचना दिल्या.
पालकमंत्र्यांनी जिल्ह्याजिल्ह्यांत कार्यक्रम घेऊन वाटप केलेली प्रमाणपत्रे घेऊन शेतकरी हिंडत आहेत. खात्यात पैसे जमा न झाल्याने विरोधी वातावरण तयार झाले असून, ते दूर कसे करायचे, ही चिंता नेत्यांना आहे.
मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंगळवारी झाली. त्यात कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी अधिकाºयांच्या नाकर्तेपणाबद्दल नाराजी व्यक्त केली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही आपल्या विभागाने १४ हजार कोटी रुपये वेळेपूर्वी सहकार विभागाला देऊनही असे घडत असेल, तर दोषींवर कारवाई करावी, असे सुनावले. प्रमाणपत्रे देण्यापेक्षा खात्यांत पैसे जमा होतील ते पाहा, या शब्दांत मंत्र्यांनी अधिकाºयांना सुनावले. काही अधिकाºयांनी याचे खापर आयटी विभागावर फोडण्याचा प्रयत्न केला.
सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस. संधू नुसतेच ‘हो करतो’ म्हणतात आणि काही करत का नाहीत, या शब्दांत काही मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
नियोजन करता येत नसताना घोषणा कशाला करता? पणन आयुक्त, सहकार आयुक्त, सहकार सचिव काय करतात, असा सवाल करीत, खातरजमा न करता पालकमंत्र्यांच्या हाती शेतकºयांच्या कर्जमाफीची प्रमाणपत्रे दिली
गेली.
>अधिकाºयांचा हलगर्जीपणा
हजारो कोटी खर्च करूनही आणि कोणाचे किती कर्ज माफ होत आहे हे प्रत्येकाला समजण्याइतकी पारदर्शकता आणूनही अधिकाºयांच्या हलगर्जीपणामुळे व नकारात्मक भूमिकेमुळे सरकारची बदनामी होत आहे, असे वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. सहकारमंत्री अधिकाºयांना जाब विचारणार नसतील तर यापेक्षा वेगळे काय होईल, अशी प्रतिक्रिया एका नेत्याने व्यक्त केली.
एकाला पत्र
उस्मानाबादमध्ये प्रमाणपत्रे परत घ्यावी लागली. विदर्भात एका शेतकºयाला १० हजार रुपयांच्या कर्जमाफीचे पत्र दिले, असे एका मंत्र्याने ‘लोकमत’ला सांगितले.