प्रवाशांच्या सेवेसी, ‘डेक्कन ओडिसी’; राजेशाही थाट प्रवास उद्यापासून पुन्हा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 06:08 AM2023-09-22T06:08:12+5:302023-09-22T06:08:38+5:30
‘डेक्कन ओडिसी २.०’ या ट्रेनला पर्यटनमंत्री गिरीश महाजन आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सीएसएमटी स्थानकावर हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले.
मुंबई - गेली चार वर्षांपासून यार्डात अडकलेल्या डेक्कन ओडिसीने कात टाकली असून ही गाडी आता पुन्हा प्रवाशांच्या सेवेस रुजू होण्यासाठी सज्ज झाली आहे. शनिवार, २३ सप्टेंबरपासून या आलिशान गाडीचा राजेशाही थाट पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा या गाडीचा उद्घाटनीय प्रवास झाला.
‘डेक्कन ओडिसी २.०’ या ट्रेनला पर्यटनमंत्री गिरीश महाजन आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सीएसएमटी स्थानकावर हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले. केंद्र व राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर रेल्वेच्या चेन्नई येथील फॅक्टरीत २००३ मध्ये डेक्कन ओडिसी ही आरामदायी ट्रेन तयार करण्यात आली. २००४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते डेक्कन ओडिसी गाडीस हिरवा झेंडा दाखविण्यात आला होता.
एमटीडीसीला मिळणार १.६४ कोटी
डेक्कन ओडिसीच्या माध्यमातून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या तिजोरीत दीड कोटीहून अधिक रुपयांची भर पडणार आहे. एमटीडीसीने ‘ईबिक्स’सोबत भागीदारी केली असून, ईबिक्स पहिल्या वर्षी एमटीडीसीला १.६४ कोटी रुपये देणार आहे.
महाराष्ट्र स्प्लेंडर : मुंबई (सीएसएमटी)- नाशिक- औरंगाबाद- कोल्हापूर- मडगाव (गोवा)- सिंधुदुर्ग- मुंबई.
इंडियन सोजन : मुंबई (सीएसएमटी) -वडोदरा- उदयपूर- जोधपूर- जयपूर- आग्रा-सवाई माधोपूर- जयपूर- नवी दिल्ली.
इंडियन ओडिसी : नवी दिल्ली- सवाई माधोपूर- आग्रा- जयपूर- उदयपूर- वडोदरा- मुंबई सीएसएमटी.
हेरिटेज ओडिसी : नवी दिल्ली- आग्रा- सवाई माधोपूर- उदयपूर- जोधपूर जैसलमेर- जयपूर- नवी दिल्ली.
कल्चरल ओडिसी : दिल्ली- सवाई माधोपूर- आग्रा- जयपूर- आग्रा- ग्वाल्हेर झांसी- खजुराहो- वाराणसी- नवी दिल्ली.
महाराष्ट्र वाईल्ड ट्रेन : मुंबई (सीएसएमटी)- छत्रपती संभाजीनगर- रामटेक- वरोरा- पाचोरा- नाशिक रोड- मुंबई (सीएसएमटी).
आत राजेशाही थाट; छताला गंज
डेक्कन ओडिसी ट्रेन अत्याधुनिक सोयी-सुविधांनी पुन्हा पर्यटकांच्या सेवेसाठी सुसज्ज आहे. आपल्या राजेशाही थाटासाठी ही गाडी ओळखली जाते; परंतु, गाडीच्या छताला गंज लागल्याचे दिसून आले. चार वर्षांनंतर यार्डातून बाहेर आलेल्या डेक्कन ओडिसी २.० या आलिशान गाडीने कात टाकली असून अंतर्बाह्य बदल करण्यात आला आहे. गुरुवारी या गाडीचे उद्घाटन पर्यटनमंत्री गिरीश महाजन आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले. यावेळी महाजन आणि नार्वेकर यांनी कॅरम खेळाचा आनंद घेतला.
प्रवास भाडे किती? : प्रतिव्यक्ती साडेसहा लाख रुपये.