Join us  

मृत महिलेची ओळख पटली

By admin | Published: December 28, 2015 3:03 AM

कुर्ला रेल्वे स्थानक परिसरातील यार्डामध्ये मृतावस्थेत आढळून आलेल्या महिलेची ओळख पटविण्यात अखेर रेल्वे पोलिसांना यश आले आहे

मुंबई : कुर्ला रेल्वे स्थानक परिसरातील यार्डामध्ये मृतावस्थेत आढळून आलेल्या महिलेची ओळख पटविण्यात अखेर रेल्वे पोलिसांना यश आले आहे. लक्ष्मीबाई (वय ४५, रा. कुर्ला) असे तिचे नाव असून, १३ डिसेंबरपासून ती बेपत्ता होती. हातावर गोंदविलेल्या मोबाइल नंबरवरून तिच्या नातेवाइकांचा शोध घेण्यात आला, मात्र तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. हार्बर आणि मध्य रेल्वेमार्गावरील कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला हे रेल्वेचे यार्ड आहे. शनिवारी दुपारी येथील काही रहिवाशांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने त्यांनी याबाबत कुर्ला रेल्वे पोलिसांना माहिती दिली होती. त्या ठिकाणी अनोळखी महिला मृतावस्थेत आढळून आली होती. मृतदेह पूर्णपणे कुजला असल्याने तिची ओळख पटवणे अशक्य होते. मात्र शवविच्छेदन करत असताना डॉक्टरांना तिच्या हातावर गोंदवलेला मोबाइल नंबर आढळून आला. हा नंबर पोलिसांकडे देताच पोलिसांनी त्यावर फोन केला असता ही महिला कुर्ला परिसरातील असल्याचे समोर आले. लक्ष्मीबाई १३ डिसेंबरपासून गायब होती. त्याबाबत तिच्या कुटुंबीयांनी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलीस तिचा शोध घेत असतानाच शनिवारी तिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिलेला दारू पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे दारूच्या नशेत ती या ठिकाणी आली असावी; शिवाय ज्या ठिकाणी मृतदेह आढळून आला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडी असल्याने रहिवाशांचा वावर तेथे होत नाही. त्यामुळे ती कोणाच्याही नजरेत आली नाही. याबाबत कुर्ला रेल्वे पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (प्रतिनिधी)