Join us  

१९ डिसेंबरला ‘जम्बो ब्लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2015 9:08 AM

कुर्ल्यातील कसाईवाडा पादचारी पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेच्या मेन लाइन आणि हार्बरवर ८ तासांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

मुंबई : कुर्ल्यातील कसाईवाडा पादचारी पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेच्या मेन लाइन आणि हार्बरवर ८ तासांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. १९ डिसेंबरच्या रात्री साडेअकरा वाजल्यापासून ब्लॉक घेतला जाणार असल्याने सीएसटी स्थानकातून मेन लाइन आणि हार्बरवरून शेवटच्या लोकल रात्री साडेअकरा वाजता सुटतील, अशी माहिती रेल्वेतील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.कुर्ला स्थानकाजवळील कसाईवाडा पादचारी पूल (सीएसटी दिशेने) हा ४0 वर्षांपेक्षा जास्त जुना आहे. त्याचप्रमाणे या पुलाची उंची कमी असल्याने एखादी लांब पल्ल्याची नवी डबल डेकर ट्रेनही सीएसटीपर्यंत धावू शकत नाही. यासह अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने हा पूल तोडून नवा पूल बांधण्याचा निर्णय मध्य रेल्वे आणि पालिकेने घेतला आहे. नवीन पूल बांधताना त्याची उंची वाढविण्यात येणार असून, साधारण २ ते ३ महिन्यांत नवा पूल बांधण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी दिली. यासाठी १९ डिसेंबर रोजी कसाईवाडा पादचारी पूल पूर्णपणे तोडण्यात येणार असून, त्यासाठी ८ तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. मेन लाइनवर कुर्ला ते माटुंगादरम्यान आणि हार्बरवर टिळकनगर ते वडाळादरम्यान रात्री साडेअकरा वाजल्यापासून ब्लॉक असेल, असे ओझा यांनी सांगितले. या ब्लॉकमुळे मध्य रेल्वे मेन लाइन आणि हार्बरवरील वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ब्लॉक दिवशी सीएसटीहून शेवटची लोकल कर्जतसाठी रात्री साडेअकरा वाजता सुटेल. तर याच वेळेत सीएसटीहून रात्री पनवेलसाठी लोकल सुटेल, अशी माहिती देण्यात आली. वेळापत्रकात झालेल्या अन्य बदलांची माहिती देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. रात्रीच्या लोकल कुर्ल्याहून सुटणारसीएसटीहून नेहमी मध्यरात्री १२.१0 वाजता कसाऱ्यासाठी व १२.३0 वाजता कर्जतसाठी सुटणाऱ्या ट्रेन ब्लॉक दिवशी कुर्ल्याहून सोडण्यात येतील. तर पनवेलसाठी नेहमी सुटणारी रात्री पाऊणची लोकलही ब्लॉक दिवशी कुर्ल्याहून सुटेल. ब्लॉक कसा असेल?- वडाळा ते टिळकनगरदरम्यान रात्री साडेअकरा ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत- कुर्ला ते माटुंगादरम्यान रात्री साडेअकरा ते पहाटे साडेपाच वाजेपर्यंत ब्लॉक असेल. मात्र काम पूर्ण न झाल्यास ब्लॉक वाढूही शकतो.