31 डिसेंबरला कुठल्या रेस्टॉरंटमध्ये 10 रुपयांत ''शिवभोजन'' मिळेल? नितेश राणेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 10:41 PM2019-12-24T22:41:58+5:302019-12-24T22:42:49+5:30
10 रुपयांतील शिवभोजन योजनेवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.
मुंबई - 10 रुपयांत भोजन मिळण्याची व्यवस्था करणाऱ्या शिवभोजन योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यामुळे शिवसेनेने निवडणुकीत दिलेल्या 10 रुपयांत भोजनाच्या आश्वासनाची पूर्तता होणार आहे. मात्र या 10 रुपयांतील भोजनावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे. हे शिवभोजन कुठल्या नाईट लाइफच्या ओपन एअर टेरेस रेस्टॉरंटमध्ये 31 डिसेंबरला 10 रुपयांत मिळेल, असा सवाल उपस्थित करत नितेश राणे यांनी शिवसेनेला नाव न घेता टोला लगावला आहे.
त्यानुसार विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समारोपाच्या भाषणात इतर मोठ्या घोषणांप्रमाणेच १० रुपयांत भोजन देण्याचीही घोषणा केली होती. त्यानंतर आज गोरगरीबांना 10 रुपयांत भोजन मिळण्याची व्यवस्था करणाऱ्या शिवभोजन योजनेला प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली आहे. मात्र या योजनेवर टीका करणाने ट्विट भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात की, ''एक प्रश्न.. 'शिवभोजन' कुठल्या नाईट लाइफच्या ओपन एअर टेरेस रेस्टॉरंटमध्ये 31 डिसेंबरला 10 रुपयांत मिळेल?'' “यथा राजा तथा प्रजा”!
एक प्रश्न..
— nitesh rane (@NiteshNRane) December 24, 2019
"शिव भोजन"
कुठल्या night life च्या
open air terrace restaurant मध्ये
31 dec ला
10 रुपयात भेटेल ??
“यथा राजा तथा प्रजा”
दरम्यान, शिवभोजन योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यासाठी तीन महिन्यांसाठी मंत्रिमंडळाने सुमारे 6 कोटी 80 लाख रुपयांची तरतूद केली आहे. शिवभोजन योजनेमध्ये शासनातर्फे सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयात प्रत्येकी ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅमची एक वाटी भाजी, १५० ग्रॅमचा एक मूद भात व १०० ग्रॅमचे एक वाटी वरण समाविष्ट असलेली शिवभोजनाची थाळी १० रुपयांत देण्यात येईल.