150 बेघरांना न्याय द्या, महापालिकेविरोधात 500 विद्यार्थी रस्त्यावर उतरले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 08:38 PM2019-02-12T20:38:17+5:302019-02-12T20:39:21+5:30
कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर राहतात 150 कुटुंब
मनोहर कुंभेजकर
मुंबई - वर्सोवा, यारी रोडच्या कवठ्या खाडीतील 150 बेघरांना न्याय मिळण्यासाठी मंगळवारी सायंकाळी वर्सोवा ते चार बंगला येथील 7 ते 8 शाळांमधील सुमारे 500 विद्यार्थी रस्त्यावर उतरले. येथील बेघरांना न्याय द्या, त्यांची पर्यायी व्यवस्था करा, त्यांना शेल्टर होम उपलब्ध करून द्या अशा जोरदार घोषणा त्यांनी दिल्या. त्यावेळी त्यांचे मुख्याध्यापक व शिक्षकही उपस्थित होते. लोकमतने या संदर्भात वृत्त देऊन याप्रश्नाला वाचा फोडली होती.
येथील चिल्ड्रन वेल्फेअर शाळेचे प्राचार्य अजय कौल यांनी गेली सात दिवस सकाळी व रात्री या बेघर कुटुंबांना जेवणाची व शौचालयाची व्यवस्था केली आहे. तर, गेले सात दिवस येथील बेघर झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळण्यासाठी कौल याच्यासह येथील सुमारे 500 सर्वधसर्मीय नागरिक, विद्यार्थी रस्तावर उतरून त्यांना पाठिंबा देत आहे.
कडाक्याच्या 7 दिवस थंडीत अन्न, वस्त्र निवाऱ्यासह रस्त्यावर तान्ह्या लेकरांसह 150 कुटुंब रहात आहेत. मुंबई महानगर पालिका व उपनगर जिल्हाधिकारी यांनी वर्सोवा, यारी रोड येथील कवठ्या खाडीतील गेले 20 ते 21 वर्षांपासून येथील सुमारे 150 झोपड्या कोणतीही नोटीस न देता आणि पर्यायी राहण्याची व्यवस्था न करता गेल्या 5 ते 7 फेब्रुवारीपर्यंत जमीनदोस्त केल्या.
दरम्यान उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन किर्तीकर व मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्राचार्य कौल यांच्याशी संपर्क साधून याघटनेची माहिती घेतली. त्यावेळी आपण कायद्याशी बांधील विकासाच्या विरोधात नाही. येथील 150 बेघर कुटुंबाची पर्यायी व्यवस्था करा, अशी विनंती त्यांनी केली. विशेष म्हणजे त्यांच्याकडे रेशनकार्ड,आधार कार्ड आणि सर्व पुरावे आहेत गेली 20 ते 21 वर्षे ते येथे वास्तव्य करत असल्याची माहिती कौल यांनी दिली.
ममता भोसले ही भवन्स कॉलेजची इयत्ता 12वीची विद्यार्थिनी आहे. तर रकय्या शेख ही चिल्ड्रन वेल्फेअर शाळेचे इयत्ता 12 वी कॉमर्सची विद्याथीनी आहे. समरिन शेख ही यारी रोड येथील अंजुमन इस्लाम शाळेतील इयत्ता 10वीची विद्यार्थी आहे. 12 वीच्या परीक्षा 21 मार्च तर 10 वीच्या परीक्षा 2 मार्चपासून आहेत. आमच्या झोपड्या तोडतांना आमच्या वह्या, पुस्तके सुद्धा, निर्दयीपणे पालिका व पोलिस आमच्या वह्या,पुस्तके सुद्धा घेऊन गेले. आम्ही आता अभ्यास कसा करायचा असा सवाल त्यांनी केला. याप्रकरणी उपनगर पालकमंत्री व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान माजी अतिरिक्त पोलिस आयुक्त ए.ए.खान, प्रभाग क्रमांक 59 च्या शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका प्रतिमा खोपडे, नगरसेविका मिहिर हैदर, माजी नगरसेवक मोहसिन हैदर, माजी नगरसेवक याकूब मेमन, सुंदरी ठाकूर आणि अनेक मान्यवरांनी आणि येथील नागरिकांनी या बेघरांना आपला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, शिक्षण मंत्री व उपनगर पालक मंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेची माहिती घेऊन लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.